नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. पण यादरम्यान दिल्लीत आणखी काही घडामोडी पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलr होती. पण शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. अशी कोणतीही चर्चा नाही झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
याआधी विरोधी पक्षनेतेपदासाठी हे विलिनीकरण केलं जावू शकतं अशी बातमी येत होती. कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण संख्येंच्या १० टक्के जागा जिंकण आवश्यक असतं. काँग्रेसला जर विरोधी पक्षनेतेपद हवं असेल तर त्यांना एकूण ५४ जागा हव्या आहेत. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या आहेत. पण शरद पवार यांनी आता हे वृत्त फेटाळल्याने विरोधीपक्ष नेतेपदाचं काय होणार हे येणारी वेळच सांगेल.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं विलिनीकरण झालं तर काँग्रेसच्या खासदारांचं संख्याबळ हे ५७ वर पोहोचेल. विलिनीकरण झालं तर राहुल गांधी हे विरोधीपक्ष नेते होऊ शकतात. अशी देखील चर्चा आहे.
शरद पवार यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.