महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला मिळाले 4 कॅबिनेटमंत्री; 17 जिल्ह्यांना प्रतिनिधीत्वच नाही

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बाबी प्रकर्षानं समोर आल्यात. मंत्रिमंडळ विस्तारात एकट्या सातारा जिल्ह्याला एक दोन नव्हे चार कॅबिनेटमंत्रिपदं मिळालीयेत. हे कमी की काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा साताऱ्याचे भूमिपूत्र आहेत.

वनिता कांबळे | Updated: Dec 16, 2024, 08:43 PM IST
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला मिळाले 4 कॅबिनेटमंत्री; 17 जिल्ह्यांना प्रतिनिधीत्वच नाही title=

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सातारा जिल्ह्याची चांदी झालीय. इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेटमंत्री मिळालेत. चार मंत्रिपदं मिळाल्यानं सातारकर खूश आहेत. शेजारच्या सांगली आणि सोलापूरला मात्र एकही मंत्रिपद मिळालेलं नाही. सांगलीसह राज्यातल्या सतरा जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व मिळालेलं नाही.

शिवसेनेचे शंभूराज देसाई, भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे मकरंद पाटील या चार आमदारांना मंत्रीपदाची लॉटली लागली आहे.  हे चार जण कॅबिनेटमंत्री झालेत. मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करणारे चार मंत्री असल्यानं साताऱ्यात आनंदाचं वातावरण आहे. असं असताना शेजारच्या सांगली जिल्ह्याला मात्र एकही मंत्रिपद मिळालं नाही. 

एकेकाळी सांगली राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू होती. पण आता सांगलीला एकही मंत्रिपद मिळालेलं नाही. सांगली असा एकटा जिल्हा नाही. राज्यातील सतरा जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळालेलं नाही. नंदुरबार, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, पालघर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली जिल्ह्याला मंत्रीपद मिळालेली नाही. सांगलीला मंत्रिपद मिळालं नसल्यानं विरोधकांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय.

पुढच्या वेळेला सांगलीचं मंत्रिपद फिक्स असल्याचं सांगून भाजप कार्यकर्ते स्वतःचीच समजूत काढतायत. सत्तेचं वाटप करताना विभागीय आणि सामाजिक समतोल बाळगला जातो. यावेळी साताऱ्याला मिळालेला वाटा थोडा जास्तच म्हणावा लागेल. मंत्रिमंडळात एकदोन मंत्रिपदं रिक्त आहेत. शिवाय पुढच्या अडीच वर्षांत आणखी काहींना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. त्यामुळं तेव्हा तरी 17 जिल्ह्यांपैकी काहींना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा आहे.