नरेंद्र मोदींच्या बाहुबली नेतृत्वाला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या मोर्चाची आखणी सुरू? काय घडतंय दिल्लीत वाचा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बँनर्जींच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडणारे प्रशांत किशोर लोकसभा निवडणूका 2024 साठी विरोधी पक्षांची मोट बांधण्यात व्यस्त झाले असल्याचे दिसत आहे.

Updated: Jun 21, 2021, 04:27 PM IST
नरेंद्र मोदींच्या बाहुबली नेतृत्वाला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या मोर्चाची आखणी सुरू? काय घडतंय दिल्लीत वाचा title=

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बँनर्जींच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडणारे प्रशांत किशोर लोकसभा निवडणूका 2024 साठी विरोधी पक्षांची मोट बांधण्यात व्यस्त झाले असल्याचे दिसत आहे. त्याला कारणही तसेच आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक पार पडली. त्यानंतर मंगळवारी राष्ट्र मंचची बैठक होणार आहे.

शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होणार राष्ट्र मंचाची बैठक

मोदी सरकारच्या धोरणांच्या विरोधात राष्ट्रमंचाची बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी मंगळवारी होणार आहे. राष्ट्र मंचच्या बैठकीत शरद पवार पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. 

यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंचाची स्थापना केली

राष्ट्र मंचाची स्थापना 2018 मध्ये माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केली होती. मंगळवारी होणाऱ्या बैठकीत शरद पवार, यशवंत सिन्हा, यांच्या शिवाय आम आदमी पार्टीचे संजय सिंह, पवन वर्मा यांच्यासह काही नेते येण्याची शक्यता आहे.

यशवंत सिन्हा यांनी 2018 साली देशाच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्र मंचची स्थापना केली होती. त्यामध्ये विरोधी पक्ष तसेच गैर राजकीय व्यक्ती देखील होते. राष्ट्र मंचाचा हेतू सरकारच्या चूकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवणे होय.

तिसऱ्या मोर्चासाठी प्रयत्न सुरू

राष्ट्र मंच हा राजकीय मंच नाही. परंतु भविष्यात या माध्यमांतून भारतीय राजकारणात तिसऱ्या मोर्चाच्या स्थापनेची शक्यता नाकारता येत नाही.

बैठकीत कॉंग्रेसनेते सामिल होणार नाही

शरद पवार यांच्या घरी मंगळवारी राष्ट्र मंचची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कॉंग्रेस नेते उपस्थित राहणार नाहीत. कॉंग्रेसनेते शत्रुघ्न सिन्हा आणि मनीष तिवारी या मंचाचे सदस्य आहेत. परंतु ही बैठक पवारांच्या घरी होणार असल्याने कॉंग्रेस नेते त्याला उपस्थित राहणार नाहीत.

राष्ट्र मंचला ममता बॅनर्जी यांचेही समर्थन

राष्ट्र मंचाची स्थापना करणारे यशवंत सिन्हा आता तृणमुल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. राष्ट्र मंचला आधीच ममता बँनर्जी यांचे समर्थन आहे. नुकत्याच पश्चिम बंगालच्या झालेल्या निवडणूका लक्षात घेता प्रशांत किशोर यांची त्यात महत्वाची भूमिका होती. त्यामुळे टीएमसीचे समर्थन असलेल्या राष्ट्र मंचच्या माध्यमांतून किशोर ममता बॅनर्जींचा चेहरा तिसऱ्या मोर्च्यासाठी पुढे करीत असल्याची  शक्यता नाकारता येत नाही. 

असे झाल्यास शरद पवारांचे नेतृत्व या मोर्चाचे संयोजक म्हणूनही पुढे येऊ शकते. सध्या हे सर्व अंदाज असले तरी, तिसऱ्या मोर्चासाठी शरद पवार यांची भूमिका येत्या काळात भारतीय राजकारणात उलथापालथ घडवून आणू शकते. त्यामुळे पवार आणि किशोर यांच्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.