भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

शत्रुघ्न सिन्हांच्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

Updated: Mar 23, 2019, 06:47 PM IST
भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या वाटेवर? title=

पाटणा : २०१९ लोकसभा निवडणूकीच्या घोषणांच्या आधीपासूनच यंदाच्या निवडणुकीत बिहारमधून भाजपाचे शत्रुघ्न सिन्हा यांना तिकीट न देण्याबाबत चर्चा सुरू होती. शनिवारी बिहारमध्ये भाजपाची यादी जाहीर करण्यात आली. या यादीतून शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव वगळण्यात आले असून शत्रुघ्न सिन्हांच्या पाटणा साहिब या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

शत्रुघ्न सिन्हा नेहमीच भाजपावर टीका करत असतात. कधी एखाद्या मंचावरून तर कधी सोशल मीडियावरून भाजपाच्या धोरणांवर आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरही टीका कत असतात. होळीच्या आधीही शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करत मोदींच्या 'चौकीदार'बाबत टीका केली होती. या सर्व प्रकरणांमुळे यावेळी शत्रुघ्न सिन्हा भाजपाच्या तिकीटावर संसदेत पोहचणार नसल्याची शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात आली होती. काँग्रेसच्या एका नेत्याने २४ किंवा २५ मार्चला शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये एन्ट्री करणार असल्याचे सांगितले. 

भाजपाची यादी जाहीर होण्याआधी शत्रुघ्न सिन्हांनी ते पाटणातील साहिबमधूनच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. परंतु भाजपाकडून आता शत्रुघ्न सिन्हांच्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाच्या या निर्णयानंतर आता शत्रुघ्न सिन्हा काय पाऊलं उचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.