अहमदाबाद : ड्रग्सचा धंदा चालवण्यासाठी ड्रग्स माफिया काही ना काही नवीन मार्ग शोधत असतात. अहमदाबादमध्ये सध्या शहरातील भिकारी ड्रग्स माफियांच्या निशाण्यावर आहेत. नव्या अंमली पदार्थांची चाचणी करण्यासाठी भिकारी आणि बेघर लोकांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवीन अंमली पदार्थाची नशा किती आहे आणि किती प्रभावी आहे याची चाचणी भिकाऱ्यांवर केली जात आहे. याचे चांगले परिणाम आले तर ते अंमलीपदार्थ बाजारात मोठ्या किंमतीला विकले जात आहेत.
ड्रग्सचा धंदा करणारे हे लोक सहसा अहमदाबादमधील रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर भिकारी आणि फुटपाथवर राहणारे लोक शोधतात. मग हे अंमलीपदार्थ त्यांना काही पैशांचं आमिष दाखवून दिली जातात. ही औषधे घेणाऱ्या भिकाऱ्यांच्या जीवाला धोका असतो. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मते, ड्रग्स माफियांच्या या व्यवसायाची त्यांच्याकडे माहिती आहे, पण आतापर्यंत यासंदर्भात कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.
कालुपूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर फूटपाथवर राहणाऱ्या सलीम मोहम्मदला एकदा ड्रग माफियांनी लक्ष्य केलं होतं. 38 वर्षीय सलीम गांजा धूम्रपान करतो. जवळच्या फूटपाथवर राहणाऱ्या एका भिकाऱ्याने त्याला नशेसाठी एक नवा अंमलीपदार्थ दिला. पण या अंमलीपदार्थाची नशा करताच सलीमला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या.
असाच काहीचा प्रकार आणखी एका भिकाऱ्याच्या बाबतीत झाला. त्यानं या नव्या अंमलीपदार्थाची नशा केली आणि तो हिंसक बनला. भिंतीवर त्याने आपले हात आपटण्यास सुरुवात केली, यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापतही झाली.
24 वर्षांच्या महरुनिसा शेख यालाही काही अज्ञात लोकांनी एक गोळी दिली. ही गोळी घेताच सर्व आजार दूर होतील, असं त्याला सांगण्यात आलं. महरुनिसाने पाण्याबरोबर ती गोळी खाल्ली आणि काही मिनिटातच त्याला चक्कर येऊ लागली.
दरम्यान, अहमदाबाद पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून ड्रग्स माफियांच्या या नव्या मोडस ऑपरेंडीचा शोध घेतला जात आहे.