Air India Flight : मंगळवारी सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच एअर इंडियाचं एक विमान मदुराईहून सिंगापूरच्या दिशेनं निघालं. पण, एअर इंडिया एक्सप्रेसच्या या विमानाचत अचानकत गोंधळाची आणि काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कारण, या विमानाला एकाएकी लढाऊ विमानांनी घेराव घातला होता.
विमान हवेत झेपावलेलं असतानाच दोन लढाऊ विमानांनी त्याला घेरणं ही गंभीर बाब लक्षात येताच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मंगळवारी, म्हणजेच 15 ऑक्टोबरला एअर इंडियाच्या 7 विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती देणारा एक मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाला. ज्यामुळं तातडीनं विविध विमानतळांवर संरक्षण दलांनी महत्त्वाची पावलं उचलली. या यादीत मदुराईहून सिंगापूरला निघालेल्या विमानाचाही समावेश होता.
बॉम्ब असल्याची माहिती मिळताच सिंगापूरच्या वायुदलानं सक्रिय होत एअर इंडियाच्या 'त्या' विमानाचा पाठलाग करण्यासाठी 2 लढाऊ विमानं पाठवली. एअर इंडियाच्या आयएक्स684 विमानात बॉम्ब असल्याची अफवा उठताच सिंगापूरच्या वायुदलाच्या ताफ्यातील F-15SG या लढाऊ विमानांनी एअर इंडियाच्या फ्लाईटचा पाठलाग केला. याच विमानांनी प्रवासी विमानाला दाट वस्तीच्या भागापासून दूर नेत ते चांगी विमानतळावर लँड करण्यात आलं. विमान लँड होताच तातडीनं त्याची तपासणीही करण्यात आली. पण, बॉम्ब असल्याची अफवाच असल्याचं तपासानंतर उघड झालं.
पोलिसांच्या माहितीनुसार रात्री 8 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. ज्यानंतर विमान सुरक्षित स्थळी उतरवून त्याची तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार नागरिक, प्रवाशांमध्ये जाणीवपूर्वक भीती निर्माण करण्यासाठी ही धमकी देण्यात आली असून, हे दुष्कृत्य करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई केली जाणार आहे.
(1/3) Air India Express received an email that there was a bomb on board flight AXB684 that was bound for Singapore. Two of our RSAF F-15SGs scrambled and escorted the plane away from populated areas, to finally land safely at Singapore Changi Airport at around 10:04pm tonight. pic.twitter.com/tOzo6wgT5E
— Ng Eng Hen (@Ng_Eng_Hen) October 15, 2024
सदर सर्व प्रकार सुरु असतानाच धमकी मिळाल्यापासून लढाऊ विमानांनी पाठलाग करेपर्यंत भारतातून निघालेलं हे विमान तासभर आकाशातच घिरट्या घालत होतं. रात्री साधारण 10.04 वाजता या विमानाचं लँडिंग करण्यात आलं. दरम्यान, मागील काही दिवसांपासून भारतातून निघणाऱ्या अनेक विमानांमध्य बॉम्ब असल्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. सध्या पोलीस आणि इतर सर्वच संरक्षण यंत्रणा या धमक्यांमागील सूत्रधार नेमकं कोण आहे याचा शोध घेत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला जात आहे.