Shocking! रूग्णालयाच्या शवृगहात 2 कोरोना रूग्णांचे मृतदेह, तब्बल16 महिने सगळेच अनभिज्ञ

रूग्णालयाला मृतदेहांचा पडला विसर....

Updated: Nov 30, 2021, 07:22 AM IST
Shocking!  रूग्णालयाच्या शवृगहात 2 कोरोना रूग्णांचे मृतदेह, तब्बल16 महिने सगळेच अनभिज्ञ

बंगलुरू : जगाचा निरोप घेतलेल्या मुनिराजू यांच्या कुटुंबाला आज आपली फसवणूक झाल्याची भावना येत आहे. 67 वर्षीय मुनिराजू यांचे 2 जुलै 2020 रोजी बेंगळुरू येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तो काळ होता. जेव्हा मृतांचे मृतदेह नातेवाईकांना दिले जात नव्हते. मुनिराजू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत यासाठी कुटुंबीयांनी रुग्णालय आणि बेंगळुरू महानगरपालिकेला संमतीही दिली होती.

रूग्णालयाच्या फ्रीजरमध्ये रूग्णाचे मृतदेह 

जवळपास अशीच कथा 40 वर्षांच्या दुर्गेचीही आहे. 2 जुलै 2020 रोजी दुर्गा यांचाही मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी प्रशासनाने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. परंतु या दोन्ही मृत्यूचे सत्य आता समोर आले आहे. 

हे सत्य अतिशय धक्कादायक आहे. दोघांचेही मृतदेह ईएसआय हॉस्पिटलच्या शवागाराच्या रेफ्रिजरेटरमध्ये पडून राहिले आणि कुजले आहेत. या मृतदेहांची कोणीही काळजी घेतली नाही. याठिकाणी दोन्ही कुटुंबे आपापल्या कुटुंबीयांवर अंत्यसंस्कार करून आपापल्या धार्मिक रितीरिवाजानुसार श्राद्धविधी पार पाडल्याचा समज करून बसले होते.

दोन्ही मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात पडून आहेत. गेल्या शनिवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाच्या संपूर्ण प्रशासकीय विभागात खळबळ उडाली होती. हे मृतदेह कोणत्या परिस्थितीत सापडले, ते कसे समोर आले याबाबत रुग्णालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच रुग्णालयातील कोणताही अधिकारी या विषयावर बोलण्यास तयार नाही.

16 महिन्यांनंतर शोध संपला 

रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही मृतदेह रुग्णालयाच्या जुन्या शवागाराच्या फ्रीझरमध्ये ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील कर्मचारी बेंगळुरू महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत होते. यावेळी रुग्णालयाचे नवीन शवागार सुरू करण्यात आले व त्यानंतर सर्व मृतदेह नवीन शवागारात ठेवण्यात आले. हे दोन्ही मृतदेह जुन्या शवागारात पडून होते. तब्बल 16 महिन्यांनंतर शनिवारी हे दोन्ही मृतदेह सापडले.

ही बाब उघडकीस आल्यानंतर आता पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण निष्काळजीपणाचे आहे की यामागे आणखी काही कारण असावे याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या विनंतीवरून दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदनही करण्यात येत आहे.