सीतापूर : उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर येतंय. नशेच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीनं आपल्या तीन मुलींना चालत्या रेल्वेतून खाली ढकलून दिलं... या घटनेत एका मुलीचा मृत्यू झालाय.
रेल्वे पोलीस दलाचे निरीक्षक धनंजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी रेल्वे लाईनजवळच वेगवेगळ्या स्थानांवर दोन मुली गंभीर जखमी अवस्थेत दिसल्या... तर तिथूनच थोड्या अंतरावर एका मुलीचा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची सूचना दिली.
जखमी अवस्थेत आढळलेल्या पाच वर्षीय अल्बतुम या मुलीनं दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुली बहिणी आहेत. आपल्या वडिलांसोबत काकांकडे जाण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा अल्बतुम, सलीमा आणि मुन्नी निघाल्या होत्या. बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील आपल्या गावी त्या जात होत्या.
पण, यावेळी तिचे काका आणि वडील नशेच्या अंमलाखाली होते... त्यातच त्यांनी या तिघींनाही चालत्या गाडीतून खाली फेकून दिलं.
या घटनेत सहा वर्षीय मुन्नीचा जागीच मृत्यू झाला. तर अल्बतुम आणि सलिमाला जिल्हा रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं. पोलिसांनी या घटनेची अधिक चौकशी सुरू केलीय.