ढेहराडून, लखनऊ : भारतीय हवामान खात्याने पावसाची वर्दी दिलेली असताना मान्सून संपूर्ण देशात पोहोचायला अजून वेळ आहे. मात्र, उत्तरखंडामध्ये ढगफुटी झालेय. याचा फटका चार जिल्ह्यांना बसलाय. तर उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वादळाचा तडाखा बसलाय. या वादळात ६ जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नद्या आणि नाले दुधडी भरून वाहू लागल्यात. काहींच्या घरांमध्येही पाणी शिरले आहे. पादचारी मार्ग वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ढगफुटीमुळे बद्रीनाथ महामार्ग आठ तास बंद ठेवण्यात आला. तर उत्तराखंडमध्ये पुढील २४ तासात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तराखंडमध्ये मान्सून पोहोचायला अजून वेळ असला तरी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. उत्तराखंडमधील बिघडलेलं वातावरण लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ढेहराडून, उधमसिंहनगर, हरिद्वार आणि पौडी गढवालमध्ये ७० ते ८० किमीच्या वेगाने वारे वाहतील. उत्तराखंडाच्या डोंगराळ भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये वातावरण खराब झाल्यानंतर दिल्लीमध्येही जोरदार वादळ आले. राजधानी दिल्लीतील अनेक भागात धुळीचे वादळ होते. अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. अलीपूरमध्ये विजेचा खांब एक दूचाकीवर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशात शुक्रवारी हवामानात अचानक संध्याकाळी बदल दिसून आला. याठिकाणी जोरदार पाऊस आणि वादळ झाले. या पावसामुळे हवामानात गारवा झाला तरी वादळी पावसाचा मोठा फटका बसला. बिजनोर, मोरादाबाद, रामपूर, मेरठ, अलीगढ येथे जोरदार फटका बसला. वादळामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. वादळामुळे मोठे नुकसान झालेय. काही ठिकाणी रेल्वेवर झाडे पडली. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम दिसून आला. तर जिल्हा रुग्णालयाबाहेरील वृक्ष पडल्याने अनेक गाड्यांना नुकसान झाले आहे.
उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागांत वादळामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ मोरादाबादमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला सहारणपूर, मुजफ्फरनगर आणि अमरोहा येथे एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी वादळ वादळांमुळे, टिनबीड, होर्डिन्ससह फ्लेक्स बोर्ड कोसळले. अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. तीव्र वादळामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला.