...तर एव्हाना माझं लग्न झालं असतं; पार्थ पवारांची मिष्किल टिप्पणी

पार्थ पवार भाषण करण्यासाठी पूर्व तयारी करून आल्याचे दिसून आले.

Updated: Mar 24, 2019, 04:03 PM IST
...तर एव्हाना माझं लग्न झालं असतं; पार्थ पवारांची मिष्किल टिप्पणी title=

पिंपरी-चिंचवडमध्ये मला एवढे प्रेम मिळालंय की मला वाटतं मी १८ वर्षांपासून काम सुरू केलं असतं तर आता पर्यंत माझं लग्न झालं असतं. उगाचचं वेळ घालवला तिकडे मुंबईमध्ये असं वक्तव्य मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी केलंय. शनिवारी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. गेल्यावेळी पार्थ यांनी जाहीर सभेत पहिल्यांदाच भाषण केलं.त्यानंतर नेटकऱ्यांकडून समाज माध्यमांवर या भाषणाची खिल्ली उडवण्यात आली. मात्र यावेळी ते भाषण करण्यासाठी पूर्व तयारी करून आल्याचं दिसून आलं.

त्याचप्रमाणे इस्कॉन मंदिराच्या रथयात्रेत पार्थ पवार सहभागी झाले होते. यावेळेस त्यांनी हरे राम हरे कृष्णावर ठेका धरला. निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी चक्क रस्त्यावर ठेका धरला आणि रथ यात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी सुद्धा पार्थ पवार यांच्या सोबत हरे राम हरे कृष्णावर ठेका धरला.

पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ १७ मार्चला मोठ्या धुमधडाक्यात झाला. पण पार्थ पवार यांच्या प्रचारापेक्षा इंग्रजाळलेल्या मराठीत त्यांनी केलेल्या भाषणाचीच चर्चा अधिक झाली आणि ते ट्रोलही झाले. आपल्या पहिल्याच भाषणामुळे ट्रोल झालेल्या पार्थ पवार हे आपला राजकीय वारसा कसे जपतील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता. पार्थ पवार यांना आपले कर्तृत्व आणि वक्तृत्वही सिद्ध करावे लागणार आहे हे निश्चित. यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे.