Son Killed Parents Due To PUBG: उत्तर प्रदेशमधील झाशीमध्ये एका तरुणाने आपल्या आई-वडिलांची धारधार शस्त्राने हात्या केल्याची घटना समोर आली आहे. सकाळी दूधवाल्याने घरातील सर्व दृष्य पाहिल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. या दूधवाल्याने घराच्या खिडकीतून डोकावून पाहिलं असता घरमालक आणि त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले. पुढील तपासामध्ये मुलानेच या दोघांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या हत्येमागे पबजी हा गेम असल्याची माहिती समोर आली आहे.
झाशीमधील नवाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. पेशाने शिक्षक असलेले 60 वर्षीय लक्ष्मी प्रसाद पत्नी विमला (55) आणि मुलगा अंकित (28) बरोबर गुमनाबार परिसरात वास्तव्यास होते. शनिवारी सकाळी दूधवाला लक्ष्मी प्रसाद यांच्या घरी आला असता त्याने दरवाजा वाजवला. मात्र कोणीही दरवाजा उघडला नाही म्हणून त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिलं तर त्याला धक्काच बसला.
घरातील हॉलमध्ये लक्ष्मी प्रसाद आणि त्यांची पत्नी विमल ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. दूधवाल्याने आरडाओरड केला. त्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी घराचा दरवाजा तोडून लक्ष्मी प्रसाद यांच्या घरात प्रवेश केला. पत्नी-पत्नी दोघेही गंभीर जखमी असल्याचं दिसून आलं. तर घरातील एका कोपऱ्यामध्ये मुलगा अंकित भयभीत झालेल्या अवस्थेत बसल्याचंही शेजाऱ्यांना दिसून आलं. पोलिसांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली. पोलिसांनी लक्ष्मी प्रसाद आणि विमल यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र लक्ष्मी प्रसाद यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर उपचारांदरम्यान विमल यांनी प्राण सोडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी मुलगा अंकितला ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणासंदर्भात झाशीचे एसएसपी राकेश एस यांनी सविस्तर माहिती दिली. मुलगा अंकितने लाठीने मारहाण केल्याने पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यानंतर या तरुणाने धारदार शस्त्राने या दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. मानसिक संतुलन बिघडलेल्या अंकितने आपणच आई-वडिलांना मारहाण केल्याचं मान्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अंकितला मागील 2 वर्षांपासून मानसिक आरोग्यासंदर्भातील समस्या आहे. तो सतत पबजी गेम खेळायचा. दिवस-रात्र तो मोबाईलवर केवळ पबजी खेळत असल्याचं पाहायला मिळालं. याच गेममुळे त्याचं मानसिक आरोग्य बिघडलं होतं. दिवसोंदिवस त्याची ही समस्या वाढत गेली. शुक्रवारी रात्री झालेल्या भांडणातून अंकितने आधी वडिलांवर हल्ला केला. त्यानंतर त्याने आईलाही बेदम मारहाण केली.