Sovereign Gold Bond: स्त्रियांसाठी सोन्याचे दागिने म्हणजे जीव की प्राण. सोन्यात केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही. अडचणीच्या काळात सोने गहाण ठेवून किंवा विकल्यास त्याचा चांगला फायदा होतो. तुम्हीदेखील सोन्यात गुंतवणूक करण्याची तयारी करत आहात तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आजपासून सरकार बाजारभावापेक्षा स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. सार्वभौम रोखे म्हणजेच सॉव्हरिन बाँड स्कीम 2023-24 ची दुसरी सीरीज आजपासून लाँच होत आहे. त्यामुळं गुंतवणुकदारांना पाच दिवस म्हणजेच 15 सप्टेंबरपर्यंत खरेदी करु शकतात. या आधी पहिली सीरीज मागील 19 जून 2023 रोजी सुरू करण्यात आली होती.
गुंतवणुकदारांना चांगला परतावा देणारी ही योजना आहे. सॉव्हरिन गोल्ड बाँड स्कीमचा उद्देश भौतिक सोन्याची मागणी कमी करणे हा आहे. म्हणूनच सरकार बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने विकत आहे. या सीरीजमध्ये 5,923 रुपये प्रती ग्रॅम इतकी सोन्याची किंमत आहे. गोल्ड बॉन्डची किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA)द्वारे निर्धारित केली जाते. ही किंमत 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीवर आधारित असते.
SGB योजनेअंतर्गंत सोने खरेदी करण्याचा फायदा म्हणजे इथे बाजारभावापेक्षा कमी किंमतीत शु्द्ध सोने खरेदी करता येऊ शकते. यात आधीच बाजारात सोन्याचा जो दर आहे त्याच्या तुलनेत सोन्याचा भाव कमी ठेवला जातो. ऑनलाइन खरेदी केल्यास नागरिकांना 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट दिली जाते. त्यामुळं आता सोन्यात गुंतवणुक करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. जर तुम्ही सॉव्हरिन गोल्ड बाँड स्कीममध्ये ऑनलाइन पद्धतीने सोने खरेदी करत आहेत तर तुमच्यासाठी 1 ग्रॅम सोन्याचा भाव 5,923 रुपये नाही तर फक्त 5,873 रुपये प्रती ग्रॅम असणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि भारत सरकारकडून ही योजना राबवली जाते. हे बाँड बँक (स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नॉमिनेटेड टपालऑफिस, मान्यताप्राप्त स्टॉक एक्जचेंज सारख्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (BSE) च्या माध्यमातून विकले जातात. या योजनेअंतर्गंत एका आर्थिक वर्षात एक व्यक्ती जास्तीत जास्त 500 ग्रॅम गोल्ड बॉन्ड खरेदी करु शकतात. तर खरेदीदार कमीत कमी एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक केली जाते.