'त्या' विधानाबद्दल अखेर आझम खान यांनी मागितली माफी

आझम खान यांची वर्तणूक चांगली नाही.

Updated: Jul 29, 2019, 12:45 PM IST
'त्या' विधानाबद्दल अखेर आझम खान यांनी मागितली माफी  title=

नवी दिल्ली: समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी अखेर लोकसभेत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. भाजप खासदार रमादेवी यांच्याबाबत आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीत आझम खान यांनी माफी मागावी, असा निर्णय झाला होता.  त्यानुसार आज लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच आझम खान यांनी माफी मागितली. 

अध्यक्षांच्या भावना दुखावण्याचा यामागे माझा अजिबात हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून काही चूक झाली असे त्यांना वाटत असेल तर मी त्याबाबत क्षमा मागतो, असे आझम खान यांनी म्हटले.

मात्र, यानंतरही रमादेवी सभागृहात आक्रमक होताना दिसल्या. आझम खान यांची वर्तणूक चांगली नाही. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे बंद केले पाहिजे, असे रमादेवी यांनी म्हटले. 

लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना हा प्रकार घडला होता. यावेळी लोकसभेच्या उपाध्यक्ष रमा देवी सभागृहाचा कारभार सांभाळत होत्या.

तेव्हा आझम खान यांनी रमा देवी यांना उद्देशून म्हटले की, तुम्ही मला इतक्या चांगल्या वाटता की, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघतच राहावेसे वाटते. मला मुभा मिळाली तर मी कधी तुमच्यावरून नजर हटवणारच नाही, असे आझम खान यांनी म्हटले होते. यानंतर सभागृहात गदारोळ उडाला होता.

यानंतर आझम खान यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला होता. माझ्या मनात तुमच्याविषयी आदर आहे. तुम्ही मला बहिणीप्रमाणे आहात, असे आझम खान यांनी सांगितले, असे आझम खान यांनी म्हटले होते.