नवी दिल्ली : केंद्र सरकार हे क्रीडा संघटनांच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही. कारण, या स्वायत्त संस्था आहेत; असं म्हणत केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्ह्जवरील 'बलिदान' मानचिन्हाप्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्याच सामन्यानंतर या चर्चा सुरु झाल्या. ज्यामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या हँडग्लोव्ह्जवर असणाऱ्या 'बलिदान' मानचिन्हावरुन त्याच्यावर आयससीकडून आक्षेप घेण्यात आला होता.
आयसीसीकडून होणारा विरोध पाहता अखेर बीसीसीआयने यात लक्ष घालत धोनीची पाठराखण केली. लेखी स्वरुपात माहिची पाठराखण केल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली. क्रीडाविश्वातील या सर्व घडामोडी पाहता केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली.
Sports Minister Kiren Rijiju: Govt doesn't intervene in affairs of sports bodies,they are autonomous. But when issue is related to country's sentiments,then interest of the nation has to be kept in mind. I would like to request BCCI to take up the matter with ICC. #Dhoni pic.twitter.com/AqFfCrTOqe
— ANI (@ANI) June 7, 2019
'क्रीडा संघटनांच्या कार्यपद्धतीत सरकार कधीच हस्तक्षेप करत नाही. कारण, या स्वायत्त संस्था आहेत. पण, गोष्ट ज्यावेळी देसवासियांच्या भावनांशी जोडली जाते तेव्हा मात्र देशहिताला महत्त्व दिलं गेलं पाहीजे', असं म्हणत रिजीजू यांनी बीसीसीआयला संपूर्ण प्रकरणात लक्ष देण्याची विनंती केली. देशाच्या स्वाभिमानाशी कोणत्याच पद्धतीची तडजोड करणार नसल्याचा इशाराच त्यांनी दिला.
सध्याच्या घडीला फक्त क्रीडा विश्वातच नव्हे तर, राजकीय वर्तुळातही माहिच्या ग्लोव्हजचं हे प्रकरण चर्चेत आलं आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांची फौज माहिच्या बाजूने उभी असल्याचं पाहायला मिळत आहे.