मुंबई : इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकामध्ये भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यातच यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी चर्चेत आला. धोनीच्या हातातील खास ग्लोव्ह्जमुळे त्याच्याविषयीच्या या चर्चा रंगल्या. त्याच्या ग्लोव्ह्जवर असणाऱ्या 'बलिदान'च्या मानचिन्हामुळे या चर्चा झाल्या. ज्यावर आयसीसीकडूनही आक्षेप घेण्यात आला होता. पण, यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मात्र धोनीची पाठराखण करत यात काहीच वावगं नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
धोनीने दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात वापरलेले पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटचे मानचिन्ह असणारे ग्लोव्ह्ज वापरू नयेत असे आदेश आयसीसीनं बीसीसीआयला दिले होते. याप्रकरणी आता बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी इंग्लंडला जाऊन आयसीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
बीसीसीआयकडून धोनीची पाठराखण करत लेखी स्वरूपात आयसीसीला याविषयीची माहिती देण्यात आली. यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी बीसीसीआयच्या एका बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याचविषयी अधिक माहिती देत विनोद राय यांनी आपण आधीच आयसीसीला लेखी स्वरुपात याविषयीची माहिती दिल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान, क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघाच्या पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या हँड ग्लोव्ह्जवर एक चिन्हं पाहायला मिळालं होतं.
आयसीसीच्या काही महत्त्वाच्या नियमांप्रमाणे राजकीय, धार्मिक किंवा वांशिंक संदेश जाईल असं कोणतंही साहित्य आणि कपडे क्रिकेट सामन्यांमध्ये वापरण्यास पवानगी नाही. त्यामुळे आता येत्या म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनी हे मानचिन्ह असलेलं ग्लोव्हज वापरतो की नाही याकडेच संपूर्ण क्रीडाविश्वाचं लक्ष लागलेलं आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्ह्जवर असणाऱ्या मानचिन्हाबाबत लष्करी अधिकाऱ्यांनीही आक्षेप नोंदवला होता. हे मानचिन्ह सैन्यात विशेष प्रशिक्षण घेतल्यावरच वापरता येऊ शकतं असं लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.