Sri Aurobindo Quotes : देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी काही व्यक्तींचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. मोदींनी उल्लेख केलेल्या या नावांमध्ये श्री ऑरोबिंदो यांच्याही नावाचा समावेश होता. ज्याच्या विचारांनी एका पिढीला बदलण्याचं आणि सन्मार्गावर आणण्याचं सामर्थ्य दाखवलं त्या गुरुदेव ऑरोबिंदो यांच्याविषयी तुम्हाला काय माहितीये? जेव्हाजेव्हा भारतात बुद्धिजीवी व्यक्तीची नावं घेतली जातात तेव्हातेव्हा श्री अरविन्द घोष म्हणजेच स्वामी ऑरोबिंदो यांचंही नाव प्रकाशझोतात येतं. अशा ऑरोबिंदो यांची जन्मतिथी 15 ऑगस्टच्या दिवशी साजरा केली जात आहे.
बालपणापासूनच श्री अरविन्द घोष यांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वाहणारं व्यक्तिमत्त्वं आपलंसं केलं होतं. 15 ऑगस्ट 1872 रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला होता. शैक्षणित जीवनात कमालीचं यश संपादन करणाऱ्या ऑरोबिंदो यांनी इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या भाषांवर प्रभुत्वं मिळवलं होतं. पुढे वडिलांचा विरोध असूनही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला आणि अनेक क्रांतिकारी कार्यांमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलं. “वन्दे मातरम्” आणि “कर्मयोगिन” यांसारख्या राष्ट्रवादी वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी संपादक म्हणून जबाबदारी पार पाडली. अशा ऑरोबिंदो यांनी त्यांच्या विचारांनी कायमच सर्वांना प्रेरित केलं. त्यांची काही वचनं आजही जीवनातील कठिणातील कठीण परिस्थितीत योग्य वाट दाखवण्याचं काम करतात.