सामान्यांसाठी खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट

विनाअनुदानित सिलेंडरची किंमत ३० रुपयांनी घटेल.

Updated: Jan 31, 2019, 07:54 PM IST
सामान्यांसाठी खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट title=

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारकडून एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १.४६ रुपयांनी कमी होणार आहे. तर विनाअनुदानित सिलेंडरची किंमत ३० रुपयांनी घटेल. गुरुवारी मध्यरात्रीपासून हे दर लागू होतील. त्यामुळे आता घरगुती गॅस सिलेंडरसाठी दिल्लीत ४९३.५३ रूपये मोजावे लागतील. मुंबईसह देशातील अन्य शहरांमध्येही ही दरकपात लागू होईल. 

गेल्या तीन महिन्यांपासून एलपीजी सिलेंडरच्या दरात सातत्याने कपात होत आहे. यापूर्वी १ डिसेंबरला अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ५.९१ रुपयांनी कमी झाली होती. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत १२०.५० रुपयांनी खाली आली होती.