Ayushi Singh : कोर्टात नेत असतानाच गोळ्या घालून वडिलांची हत्या; 8 वर्षांनी DSP होऊन मुलीने स्वप्न केले पूर्ण

Ayushi Singh : मुलीच्या अभ्यासाठी तिच्या वडिलांनी घर बांधले होते. मात्र गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पण आता त्यांचे स्वप्न मी पूर्ण केले आहे असे आयुषी सिंह सांगते. माझ्या या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा आहे असेही आयुषीने सांगितले.

आकाश नेटके | Updated: Apr 8, 2023, 05:26 PM IST
Ayushi Singh : कोर्टात नेत असतानाच गोळ्या घालून वडिलांची हत्या; 8 वर्षांनी DSP होऊन मुलीने स्वप्न केले पूर्ण title=
(फोटो सौजन्य - सोशल मीडियावरुन साभार)

Ayushi Singh : उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या (UPPSC) पीसीएस (PCS) 2022 मुख्य परीक्षेचा निकाल लागला आहे. आग्रा येथील दिव्या सिकरवार हिने पहिलं, तर लखनऊच्या प्रतीक्षा पांडे हिने दुसरा आणि बुलंदशहरच्या नम्रता सिंगने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुरादाबादची रहिवासी असलेल्या आयुषी सिंह (Ayushi Singh) देखील या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. या निकालासह गुन्हेगाराची मुलगी असलेली ओळख आयुषीने पुसून टाकली आहे. आयुषी सिंगच्या वडिलांचे नाव योगेंद्र सिंग उर्फ ​​'भूरा' असे होते. आयुषीचे वडील भूरा हे गुन्हेगार म्हणून ओळखले जात होते.

आयुषी सिंहने मोठ्या कष्टासह ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आयुषीच्या या यशानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आठ वर्षांपूर्वी आयुषीचे वडील योगेंद्र सिंह उर्फ ​​भुरा यांची न्यायालयात हजेरीदरम्यान हत्या झाली होती. वडिलांचा मारेकरी अजूनही पोलिसांपासून दूर आहे. याचे दुःख आयुषीला कायमच सतावत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आयुषीने ठरवलं होतं की पोलीस अधिकारी बनून त्या गुन्हेगारांवर कारवाई करणार. यामुळेच आयुषीने वडिलांच्या हत्येवेळी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे. मात्र, पीसीएस क्रॅक केल्यानंतर आयुषीने सांगितले की, जरी ती पोलीस उपअधीक्षक झाली असली तरी तिचे लक्ष्य आता आयपीएस बनण्याचे आहे.

आयुषी सिंहचे वडील योगेंद्र सिंग उर्फ ​​'भूरा'  हे दिलारी, मुरादाबादचे माजी ब्लॉक प्रमुख होते. भूरा यांच्यावर खुनासह अनेक गुन्हे दाखल होते. याच कारणामुळे आयुषी सिंहच्या वडिलांना गुन्हेगार म्हणून ओळखले जात होते.  योगेंद्र सिंग उर्फ ​​भूरा याची न्यायालयात हजेरीसाठी जात असतानाच हत्या झाली होती. माघ्यमांच्या वृत्तानुसार भूरा याच्या हत्येचे मारेकरी अद्याप फरार आहेत.  2013 मध्ये योगेंद्र सिंह यांचे नाव एका हत्येप्रकरणी समोर आले होते, त्यामुळे ते तुरुंगात होते. 23 फेब्रुवारी 2015 रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

कशी झाली हत्या?

4 मार्च 2013 रोजी विद्यार्थी नेता आणि शार्प शूटर रिंकू चौधरीच्या हत्येप्रकरणी योगेंद्र सिंह उर्फ ​​भुराचे नाव समोर आले होते. या प्रकरणी भुराने 20 जानेवारी रोजी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून भुरा आणि त्याचे साथीदार मुरादाबाद तुरुंगात होते. त्यानंतर 2015 मध्ये 23 फेब्रुवारीला त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आले. यादरम्यान, शूटर रिंकूचा भाऊ सुमित आणि अन्य गुन्हेगारांनी पोलीस कोठडीत भुरा यांच्यावर गोळ्या झाडल्या. भुराला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वडिलांचे स्वप्न केले पूर्ण

आयुषीने सांगितले की, तिने मिळवलेले यश हे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. "वडिलांना सुरुवातीपासूनच मी अधिकारी व्हावे असे वाटत होते. आता त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. वडिलांनी मुरादाबादमध्ये अभ्यासासाठी घर बांधले होते. मात्र त्यानंतर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. तेव्हाच मी ठरवले होते की मला भविष्यात अधिकारी व्हायचे आहे. निकाल लागताच मी लगेच फोन करून आईला कळवले. हे ऐकून आई भावूक झाली आणि म्हणाली की शेवटी तू तुझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केलेस. जेव्हा मी माझ्या आईकडून ऐकले तेव्हा माझ्या निकालाचा आनंद आणखीनच वाढला. आता मी अधिकारी बनून खूप आनंदी आहे. माझ्या यशात माझ्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे," असे आयुषी सिंहने सांगितले.