नवी दिल्ली : हिंदी महासागराला सुखोई विमानांचं सुरक्षा कवच मिळणार आहे. ब्राम्होस मिसाईलने सज्ज सुखोई ताफ्याचा आज वायुदलात समावेश होणार आहे. तंजावूरमध्ये संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे.
हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराला आता सुखोईचं सुरक्षा कवच मिळणार आहे. या क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या कोणत्याही एअरक्राफ्ट कॅरियर अथवा कोणत्याही प्रकारच्या अन्य आक्रमणाला थेट सुखोईचा दणका मिळेल. या सुखोई विमानांवर २९० किलोमीटरपर्यंत मारा करणारी अत्याधुनिक ब्राम्होस क्रूझ मिसाईल्स तैनात असणार आहेत. त्यामुळे दक्षिणेकडे प्रथमच निर्माण झालेल्या सुखोई स्क्वाड्रनची मारकक्षमता वाढली आहे.
तामिळनाडूतल्या तंजावर इथे ही स्क्वॉड्रन तयार करण्यात आली आहे. सुखोईच्या या नव्या स्क्वॉड्रनला 'टायगर शार्कस्' असं नाव देण्यात आलं आहे. सहा सुखोई विमानांच्या स्क्वॉड्रनचं उदघाटन करण्यात येणार आहे. वर्षअखेरीस ही संख्या पूर्ण म्हणजे १८ विमानांची करण्यात येईल. भारतीय समुद्रांमध्ये चीन सातत्याने प्रभाव निर्माण करतंय. त्याला थेट आव्हान देण्यासाठीच भारताने सुखोईंची ही नवी स्क्वॉड्रन दक्षिणेत निर्माण केल्याचं स्पष्ट आहे.