निर्भया प्रकरण: दोषी मुकेशची फाशी अटळ; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आहे.

Updated: Jan 29, 2020, 11:33 AM IST
निर्भया प्रकरण: दोषी मुकेशची फाशी अटळ; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली title=

नवी दिल्ली: दिल्लीतील निर्भया प्रकरणातील  (Nirbhaya Gang Rape Case) दोषी मुकेशची याचिका बुधवारी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे आता मुकेशला फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुकेशची दया याचिका फेटाळली होती. याविरोधात मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळत राष्ट्रपतींच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आहे. तिहार तुरुंगात या चौघांना फाशी दिली जाईल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आरोपींकडून शिक्षेची तारीख लांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. न्यायालयाने आज मुकेशची याचिका फेटाळल्यानंतर शिक्षेविरोधात दाद मागण्याचे त्याचे सर्व कायदेशीर प्रयत्न संपुष्टात आले आहेत. 

न्यायमूर्ती भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती भानुमती यांनी म्हटले की, राष्ट्रपतींसमोर खटल्याशी संबंधित योग्य कागदपत्रे सादर करण्यात आली की नव्हती, एवढेच पाहणे न्यायालयाचे काम आहे. मुकेशच्या वकील अंजना प्रकाश यांनी राष्ट्रपतींसमोर संपूर्ण कागदपत्रे समोर ठेवण्यात आली नाही. दया याचिका फेटाळण्यात घाई करण्यात आली, असा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.

निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. १६ डिसेंबर २०१२ रोजी राजधानी दिल्लीत २३ वर्षीय निर्भयावर धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी अत्याचार केले होते. या अमानुष कृत्यानंतर बसमधून पीडितेला रस्त्यावर फेकून देण्यात आले होते.