सर्वोच्च न्यायालयाने आंदोलकांना फटकारलं

सुप्रीम कोर्टाची आंदोलक विद्यार्थ्यांना तंबी 

Updated: Dec 16, 2019, 01:51 PM IST
सर्वोच्च न्यायालयाने आंदोलकांना फटकारलं title=
फोटो सौजन्य : एएनआय

नवी दिल्ली :  दिल्लीतल्या जामिया मिलिया मुस्लिम विद्यापीठात कॅबविरोधात आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाविरोधात केलेल्या याचिकेवरील सुनावणी उद्या होणार आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत आहे आणि हे सहन केलं जाणार नसल्याची तंबी सुप्रीम कोर्टाने आंदोलक विद्यार्थ्यांना दिली आहे. 

उद्या होणाऱ्या सुनावणीपूर्वी हिंसा थांबवण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईविरोधात  सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. इंदिरा जयसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांना बेकायदा ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच अनेक विद्यार्थी सध्या बेपत्ता आहेत असं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. 

ईशान्य भारतातील लोण आता मुंबई, हैदराबाद, लखनऊमध्येही पोहचलं आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चात हिंसाचार करत दिल्लीतील बस, खासगी वाहनं, दुचाकींची जाळपोळ करण्यात आली. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या चार गाड्यांवरही हल्ला करण्यात आला. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह १०० हून अधिक जण जखमी झाले. 

लखनऊच्या नदवा कॉलेजमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विद्यार्थ्यांनी सोमवारी हिंसक आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थ्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. मुंबईतही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनीही रस्त्यांवर उतरत निदर्शनं केली.