मुंबई : सध्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर आहेत. नुकतीच त्यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही देशांतर्गत परस्परहित आणि सहयोग वाढवण्यासाठी बोलणी झाली आहेत. ब्रिक्स आणि IBSA (भारत,ब्राजील, साऊथ आफ्रिका ) संमेलनासाठी सुषमा स्वराज पाच दिवसांच्या दौर्यावर आहेत.
शनिवारी सुषमा स्वराज दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर निघाल्या होत्या. मात्र विमानप्रवासादरम्यानच्या 14 मिनिटांसाठी भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. सुषमा स्वराज वायुसेनेच्या विमानाने उडडाण करत होत्या. दरम्यान मॉरिशिएस एअर ट्राफिक कंट्रोल (एटीसी) कडून दिल्या गेलेल्या अलर्टमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुषमा स्वराज वायुसेनेच्या ज्या विमानात होत्या ते विमान सुमारे 14 मिनिटं संपर्कात नसल्याने मॉरीशिएस एटीसीने त्याबाबत अलर्ट दिला. सामान्यपणे अर्धा तास विमान संपर्कात नसल्याने असा अलर्ट दिला जातो. मात्र सुषमा स्वराज या VIP असल्याने हा अलर्ट तात्काळ देण्यात आला असावा अशी महिती देण्यात आली आहे.
एम्बार 135 हे विमान इंधन भरण्यासाठी तिरूअनंतपुरम आणि मॉरिशिएसदरम्यान थांबले होते. या विमानाने शनिवारी दुपारी 2 वाजून 8 मिनिटांनी उड्डाण केले. भारतीय वायुक्षेत्राबाहेर विमान संध्याकाळी 4 वाजून 44 मिनिटांनी एटीएसला सुपूर्द करण्यात आले होते. भारतीय वेळेनुसार हे विमान संध्याकाळी 4.58 मिनिटांनी संपर्कात आले.