...अन् पालकांनी वर्गापासून ते मैदानापर्यंत पाठलाग करुन शिक्षकाला केली मारहाण, कारण जाणून आश्चर्य वाटेल

Crime News: तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) आपल्या सात वर्षाच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी संतापलेल्या पालकांनी पाठलाग करत शिक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पालकांना अटक केली आहे. शिक्षकाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.   

Updated: Mar 22, 2023, 04:17 PM IST
...अन् पालकांनी वर्गापासून ते मैदानापर्यंत पाठलाग करुन शिक्षकाला केली मारहाण, कारण जाणून आश्चर्य वाटेल title=

Crime News: दुसरीत शिकणाऱ्या आपल्या मुलाला मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी थेट शिक्षकालाच मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूत (Tamil Nadu) ही घटना घडली असून पालकांनी शाळेच्या आवारात पाठलाग करत शिक्षकाला मारहाण केली. पालकांनी शिक्षकावर मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. शिक्षकाने मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान पोलिसांनी पालकांना बेड्या ठोकल्या आहेत. 

तामिळनाडूच्या तुतोकिरिन जिल्ह्यात ही घटना घडली आहे. आर भरत असं शिक्षकाचं नाव असून सरकारी निधीवर चालणाऱ्या शाळेत ते शिक्षक आहेत. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत पालक वर्गात शिरुन शिक्षकाशी वाद घालत असून आपल्या मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारताना दिसत आहेत. मुलाची आई यावेळी मुलांना मारणं बेकायदेशीर असल्याचं बोलताना दिसत आहेत.

"लहान मुलांना मारहाण करणं बेकायदेशीर आहे. तुम्हाला कोणी हक्क दिले? मी तुम्हाला चपलीने मारेन," असं त्या शिक्षकाला बोलत असताना व्हिडीओत कैद झालं आहे. 

वर्गात विद्यार्थी उपस्थित असतानाही मुलाचे वडील शिवलिंगम शिक्षकाचा पाठलाग करत त्यांना मारहाण करतात. यावेळी ते शिक्षकाच्या दिशेने एक वस्तूही फेकताना दिसत आहे. ही वस्तू दगड किंवा वीट असल्याचं भासत आहे. दरम्यान, पालक शिक्षकाला मारहाण करत असताना दुसरा शिक्षक मदतीसाठी ओरडत असल्याचं ऐकू येत आहे. 

पोलिसांनी मुलाच्या आई-वडिलांसह त्याच्या आजोबांनाही अटक केली आहे. "आम्ही त्यांच्यावर हल्ला करणे, गुन्हेगारी धमकी देणे, कट रचणे आणि सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे," अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ एल बालाजी सरवणन यांनी दिली आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, शिक्षकाने विद्यार्थ्याला वर्गात लक्ष देत नसल्याने तसंच इतर विद्यार्थ्यांसोबत भांडत असल्याने दुसऱ्या जागेवर बसण्यास सांगितलं होतं. जागा बदलत असताना विद्यार्थी पडला आणि जखमी झाला अशी माहिती शिक्षकाने दिली आहे. विद्यार्थ्याने घरी जाऊन आपल्या आजोबांना शिक्षकाने मारहाण केल्याचं सांगितलं होतं.