नवी दिल्ली : दिल्लीतून एक मोठी बातमी येत आहे. दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाल्याची बातमी येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट फुटपाथजवळ झाला. यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. इस्त्रायली दूतावास दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये आहे. इस्रायली दूतावासाशेजारी झालेल्या स्फोटाची जबाबदारी सध्या कोणत्याही दहशतवादी गटाने घेतलेली नाही. मात्र, हा स्फोट कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. दिल्लीतील स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क केले गेले आहे.
या स्फोटात अद्याप कोणत्याही व्यक्तीच्या जखमीची माहिती नाही. इस्त्रायली दूतावास तुगलक रोड पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर आहे. इस्रायल दूतावासात हा स्फोट घडलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या जवळच असलेल्या बंगला नंबर 6 मधून स्फोटांचा कॉल आला होता. गुप्तचर अधिकारी, विशेष सेल आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
#WATCH | Delhi Police team near the Israel Embassy where a low-intensity explosion happened.
Nature of explosion being ascertained. Some broken glasses at the spot. No injuries reported; further investigation underway pic.twitter.com/RphSggzeOa
— ANI (@ANI) January 29, 2021
इस्त्रायली दूतावासापासून 150 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. अग्निशमन विभागाची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत.
भारत आणि इस्त्राईल आज त्यांच्या राजनैतिक संबंधांच्या 29 वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करीत आहेत. याबाबत इस्त्रायली दूतावासानेही ट्विट केले आहे.
जेथे हा स्फोट झाला ते ठिकाण विजय चौकपासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे. विजय चौक येथे यावेळी बीटिंग रिट्रीट चालू आहे, या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित आहे. हा स्फोट कसा झाला आणि कोणी केला याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी त्या भागाला वेढा घातला आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.