मुंबई : देशात अजून कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. (corona second wave) त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेशात मात्र चिंता कमी झाली आहे. त्याचवेळी केरळमध्ये कोरोनाचे रुग्णवाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ( second wave of corona in the country - Union Health Ministry)
देशात कोरोनाचा धोका कायम आहे. दुसरी लाट अजून संपलेली नाही. 8 राज्यांमध्ये ‘आर’ फॅक्टरची डोकेदुखी कायम आहे. केवळ महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये याची चिंता कमी झाली आहे. देशातील एकूण 44 जिह्यांचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा अधिक असून 57 जिह्यांमध्ये दररोज 100 नवीन रुग्ण आढळत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवळे आहे. मुंबईतील धारावीत कोरोनाचा सातव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने हे शक्य झाले आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्राला झिकाचा धोका वाढला आहे. केंद्रीय पथक पुण्यात दाखल झाले आहे. आज पुण्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. केंद्रीय पथक बेलसर गावालाही भेट देणार आहे. बेलसर गावालगतच्या 6 गावातले रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.
झिका व्हायरसचा पहिला रूग्ण पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात आढळला. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यात केंद्राचं आरोग्य पथक दाखल झाले आहे. पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे एका 50 वर्षीय महिलेला झिका संसर्ग झाला होता. झिका व्हायरस तपासणीसाठी बेलसर गावाच्या आसपासच्या सहा गावातल्या 18 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. आसपासच्या गावात 15 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 3 हजार 210 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.