close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

खेळता-खेळात तीन भावंड गाडीत अडकले, श्वास गुदमरून मृत्यू

ही बंद गाडी गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच जागी उभी होती. त्यामुळे तिच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं

Updated: May 25, 2019, 10:09 AM IST
खेळता-खेळात तीन भावंड गाडीत अडकले, श्वास गुदमरून मृत्यू

इंदोर : मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यात शुक्रवारी एक हृदयद्रावक तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आलीय. खेळता-खेळता एका गाडीमध्ये अडकलेल्या तीन चिमुकल्यांचा श्वास गुदरमरून मृत्यू झालाय. हे तिघेही सख्खे भाऊ-बहिण होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलांची ओळख पूनम (६ वर्ष), बुलबुल (४ वर्ष) आणि प्रतिक (३ वर्ष) अशी पटलीय. तीनही मुलं सकाळीच खेळण्यासाठी बाहरे पडले होते. शेजारीच्या एका रिकाम्या जमिनीवर उभ्या असलेल्या एका कारमध्ये हे तिघेही बहिण-भाऊ खेळता-खेळता शिरले. या गाडीचा दरवाजा आतून बंद झाला... आणि त्यातून बाहेर कसं पडावं हे या मुलांना लक्षात आलं नाही. 

गाडी आतून लॉक झाल्यानं तिनही मुलं आत अडकली होती. जवळपास तीन तास ते गाडीच्या आत होते परंतु, त्यांना दरवाजा उघडता आला नाही. 

ही बंद गाडी गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच जागी उभी होती. त्यामुळे तिच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं. बऱ्याच वेळानंतर तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीचं लक्ष या गाडीवर पडलं... आणि आत मुलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. 

आरडा-ओरडा करत त्यांनी आजुबाजुच्या लोकांच्या मदतीनं तीनही मुलांना बाहेर काढलं. तीनही मुलं निपचीत पडली होती. बेशुद्धावस्थेतच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तीनही मुलांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आलाय.