दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर जवानांचा जल्लोष

जम्मू काश्मीरमध्ये बारा तासांत विविध ठिकाणी घडल्या घटना   

Updated: Sep 28, 2019, 06:35 PM IST
दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर जवानांचा जल्लोष

मुंबई : संयुक्त राष्ट्र संघामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या इम्रान खान यांच्या भाषणानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू काश्मीर येथे सैन्यदलाच्या कारवाईत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. रामबन जिल्ह्यातील बटोट येथे ही कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये सैन्यदालाचे दोन जवान जखमी झाल्याचं कळत आहे. 

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार विविध ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एकून तीन ते चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे, तर एक जवान यात शहीद झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, विविध ठिकाणी झालेल्या दहशतवादी कारवायांनंतरचा सुरक्षदलाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये जवानांचा उत्साह पाहायला मिळत आहे. 

जम्मू काश्मीर पोलीसांनी वृत्तसंस्थेला याविषयीची अधिकृत माहिती दिली. जम्मूमध्ये येणाऱ्या बटोट येथे पाच दहशतवाद्यांना घेरण्यात आलं होतं. ज्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबारही झाला. त्या ठीकाणी तैनात असणाऱ्या सीआरपीएफ जवानांवर गोळीबार करत पसार होण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. 

आणखी एका घटनेमध्ये केबल ऑपरेटरच्या घरात दहशतवादी घुसले आणि त्यांनी त्या घरातील केबल ऑपरेटरच्या वयोवृद्ध वडिलांना बंधक बनवलं होतं. बराच काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार केल्यानंतर अखेर बंदी असणाऱ्या व्यक्तीची सुखरुप सुटका करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. रामबनशिवाय श्रीनगरमध्येही तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. 

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन संशयितांनी बटोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४४ येथे एक वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर या ठिकाणी हे दोन संशयित इसम आणि सैन्यदलामध्ये गोळीबार झाल्याचंही वृत्त समोर आलं होतं. शिवाय शुक्रवारी सैन्यदलाला काश्मीरच्या उत्तरेकडे असणाऱ्या कुपवाडा येथील नियंत्रण रेषेपाशी दहशतवादी आढळल्याचं वृत्त होतं.