नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने यंदा चांगलं यश मिळवलं आहे. यानंतर मुकुल रॉय यांचा मुलगा शुभ्रांशु रॉय आणि तृणमूल काँग्रेसचे २ आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिलभद्र दत्त आणि सुनील सिंह हे आज भाजपचं कमळ हातात घेणार आहेत. दिल्लीत संध्याकाळी ४ वाजता भाजपच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या भागातील जवळपास ५० नगरसेवकांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे सर्व नगरसेवक कंचरापारा, हलिशहर आणि नैहाती नगरपालिकेचे आहेत. सोबतच भाजपची भाटपारा नगरपालिकेवर सत्ता येणार आहे. भाजपचे नवनिर्वाचित खासदार अर्जुन सिंह भाटपारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत.
लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपने यंदा १८ जागा जिंकल्या आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना देखील भाजपला फक्त २ जागा येथे मिळाल्या होत्या. मुकुल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद वाढली. रॉय हे टीएमसीचे वरिष्ठ नेते होते. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी संपूर्ण रणनीती आखली. त्यांच्या नेतृत्वात भाजपने हा विजय मिळवला.
टीएमसीला पर्याय म्हणून लोकांनी भाजपला निवडलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा सत्ता मिळवणं नक्कीच आव्हानात्मक ठरणार आहे.