Tomato Price Hike: मॅकडोनाल्डच्या बर्गरमधून टोमॅटो गायब, कंपनीनं सांगितलं कारण

Tomato Price Hike: देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर कुठे 100 ते 120 रुपये प्रतिकिलो तर कुठे 120 ते 160 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईतील किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव 160 रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 7, 2023, 04:32 PM IST
Tomato Price Hike: मॅकडोनाल्डच्या बर्गरमधून टोमॅटो गायब, कंपनीनं सांगितलं कारण title=

Tomato Price Hike: देशात टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातून ही जीवनावश्यक वस्तू गायब होत आहे. मुंबईत टोमॅटोचे दर 160 च्या पलीकडे गेले आहेत. लवकरच हे दर 200 वर पोहोचतील असे म्हटले जात आहे. केवळ सर्वसामान्यच नव्हे तर जगप्रसिद्ध मॅकडोनाल्ड कंपनीवर देखील टोमॅटो दरवाढीचा परिणाम पाहायला मिळत आहे. 

मॅकडोनाल्डची टोमॅटो खरेदीसाठी धडपड सुरू आहे. आमच्या काही रेस्टॉरंटमध्ये आम्ही टोमॅटो देऊ शकत नाही, असे कंपनीने म्हटले आहे. यासंदर्भात मॅकडोनाल्ड्स भारत-दक्षिण आणि पूर्व यांनी एका निवेदन जाहीर केले आहे. कंपनीच्या मेनूमधून टोमॅटो काढून टाकण्यात आल्याची माहिती याद्वारे देण्यात आली आहे. ही एक 'हंगामी समस्या' असून लवकरच यातून मार्ग काढला जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. 

कंपनीने मेनूमधून टोमॅटो काढून टाकण्याचे कारण देखील कंपनीने स्पष्ट केले आहे. पावसाळ्यात चांगल्या दर्जाचे टोमॅटो न मिळत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीला टोमॅटोच्या कमतरतेची गंभीर समस्या भेडसावत नाही.असे असले तरी कंपनीने आपल्या 10-15 टक्के रेस्टॉरंटमध्ये टोमॅटो देणे बंद केले आहे. 

कोणताही खाद्यपदार्थ खरेदी करताना कंपनी गुणवत्तेला खूप महत्त्व देते. सध्या बाजारात उपलब्ध असलेले टोमॅटो कंपनीच्या खरेदीच्या मानकांची पूर्तता करत नसल्याने टोमॅटोची खरेदी बंद केली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 

ही तात्पुरती समस्या असून टोमॅटोची टंचाई लवकरच दूर केली जाईल, असे आश्वासन कंपनीने आपल्या ग्राहकांना दिले आहे. दरवर्षी रेस्टॉरंट उद्योगाला पावसाळ्यात चांगल्या दर्जाच्या टोमॅटोच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. मॅकडोनाल्ड चांगल्या प्रतीचे टोमॅटो मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून लवकरच टोमॅटोचा पुन्हा मेनूमध्ये समावेश केला जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

टोमॅटोचा भाव 200 रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची भीती 

टोमॅटोच्या किंमती दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री बसतेय. देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर कुठे 100 ते 120 रुपये प्रतिकिलो तर कुठे 120 ते 160 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईतील किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव 160 रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. काही दिवसांत टोमॅटोचा भाव 200 रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची भीती व्यापाऱ्यांना आहे.