अहमदाबाद : Bajrang Dal workers assault Muslim youths : आता बातमी गुजरातमधून. गरब्यात मोठा धक्कादायक प्रकार घडला. मंगळवारी रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी (Bajrang Dal workers) एका विशिष्ट धर्मातील अनेक तरुणांना अहमदाबादमधील (Ahmedabad) गरबा (Garba) स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बेदम मारहाण केली. अहमदाबादमध्ये गरबा कार्यक्रमात एका तरुणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लीम तरुणांना मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे.
गरब्यात करण्यात आलेला मारहाणीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. अहमदाबादच्या सिंधू भवन परिसरात गरब्यात काही मुस्लीम तरुण आल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर या तरुणांना शोधून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली.
सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओंमध्ये काही तरुणांना त्यांच्या धार्मिक ओळखीबद्दल प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि भगवा ब्रिगेडने त्यांना मारहाण केली आहे. गरब्यात मुस्लीम तरुणांनी मुलींची छेड काढल्याच्या आणि चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने गरब्यात येणाऱ्यांचे आधारकार्ड तपासून प्रवेश द्या, असे आवाहन केलं होते. त्यानंतर हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
एका व्हिडिओमध्ये भगवा स्कार्फ घातलेल्या काही जणांनी एका व्यक्तीला विवस्त्र केले. त्याला लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. त्या व्यक्तीने स्वत:ची ओळख सांगताच त्याची जोरदार धुलाई करण्यात आली. यावेळी गरब्याच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झालेत.