देशात तुकडे-तुकडे गँग अस्तित्वात नाही- गृह मंत्रालय

गृहमंत्र्यांनी कोणत्या माहितीच्या आधारे तुकडे-तुकडे गँग असा उल्लेख केला?

Updated: Jan 21, 2020, 07:56 AM IST
देशात तुकडे-तुकडे गँग अस्तित्वात नाही- गृह मंत्रालय

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) सरकारविरोधी आंदोलनामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यानिमित्ताने सरकार आणि आंदोलकांकडून एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'जेएनयू'मधील आंदोलकांचा उल्लेख तुकडे-तुकडे गँग असा केला होता. तेव्हापासून भाजप समर्थक विरोधकांवर टीका करताना सातत्याने तुकडे-तुकडे गँग या विशेषणाचा वापर करताना दिसत आहेत. 

या पार्श्वभूमीवर माजी पत्रकार व कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारातंर्गत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तुकडे-तुकडे गँगविषयी विचारणा केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याला उत्तर देताना आपल्याला तुकडे-तुकडे गँगविषयी कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. 

'टुकडे-टुकडे गँग' कधी व कशी अस्तित्वात आली? या गँगचे सदस्य कोण-कोण आहेत?, या गँगवर बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली बंदी का घातली जात नाही?, असे प्रश्न साकेत गोखले यांनी विचारले होते. मात्र, गृह मंत्रालयाने आपल्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. 

त्यामुळे आता साकेत गोखले यांनी अमित शहा यांच्या भूमिकेवर बोट ठेवले आहे. गृहमंत्र्यांनी कोणत्या माहितीच्या आधारे तुकडे-तुकडे गँग असा उल्लेख केला? गृहमंत्र्यांनी या गँगच्या नेत्यांची नावे जाहीर करावीत. यामध्ये तथ्य नसल्यास जनतेची दिशाभूल केल्याबद्दल अमित शहा यांनी जनतेची माफी मागावी. अन्यथा आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करू, असा इशारा साकेत यांनी दिला.