रांची : चारा घोटाळ्यातील दोषी आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना त्रास होऊ नये आणि त्यांची सेवा करता यावी म्हणून त्यांच्या दोन सेवकांनी स्वत:ला अटक करून घेतलीय, असा दावा पोलिसांनी केलाय.
यातील एकानं सहायकानं एका खोट्या प्रकरणात स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं आणि अटक करून घेतलीय. ज्या दिवशी लालूंना चारा घोटाळ्यातील दोषी करार दिलं गेलं तेव्हाच सहाय्यकानं स्वत: अटक करून घेतली होती.
या दोघांपैंकी एकाचं नाव मदन यादव आहे. तो दोन गोशाळा, एक घर आणि एका एसयूव्हीचा मालक आहे. रांचीचा रहिवासी असलेला मदन यादव सध्या सुमित यादव नावाच्या एका इसमाकडून १० हजार रुपये हडपल्याच्या आरोपाखाली बिरसा मुंडा तुरुंगात बंद आहे. या कामी त्याची मदत लक्ष्मण यादवनं केली आणि त्यालाही अटक करून याच तुरुंगात ठेवण्यात आलंय.
पोलिसांना मात्र हे दोघे लालुंच्या सेवेसाठी तुरुंगात आल्याचा संशय आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मण यापूर्वी लालूंच्या घरी सेवक म्हणून काम करत होता. पोलीस या कथित प्रकरणाचा तपास करत आहेत.