Viral Video: तरुणी रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करत असतानाच दुचाकीवरुन दोन तरुण आले अन्...; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

Bengaluru Girl Snatching Video: तरुणी रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करत असतानाच दोन तरुणांनी त्यांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडीओ (Video) ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आला असून पोलिसांनी याची दखल घेतली आहे.   

Updated: Mar 30, 2023, 05:43 PM IST
Viral Video: तरुणी रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करत असतानाच दुचाकीवरुन दोन तरुण आले अन्...; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद title=

Bengaluru Snatching Viral Video: बंगळुरुमधील (Bengaluru) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या कंटेट क्रिएटर तरुणीचा मोबाइल दुचाकीस्वार तरुणांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. तरुणी यावेळी व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याने हे तरुणही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तरुणी आपल्या मित्रांसह एका रेस्तराँच्या बाहेर असताना हा सर्व प्रकार घडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

Bangalore 360 या ट्विटर अकाऊंटला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये कंटेट क्रिएटर असणारी रुचिका रस्त्यात व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना हा प्रकार घडल्याचं दिसत आहे. चार तरुणी व्लॉग रेकॉर्ड करत असताना त्यांचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

तुम्ही गुफा रेस्तराँचा अनुभव घेतला आहे का? असं विचारत तरुणी कॅमेरा फिरवते. यावेळी तिच्यासोबत असणाऱ्या दोन तरुणी नाचण्यास सुरुवात करतात. त्याचवेळी मागून एक दुचाकी येत असल्याचं दिसत आहे. दुचाकीवर असणारे दोन तरुण यावेळी रुचिकाच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न करतात, पण ते अपयशी ठरतात आणि तसाच पळ काढतात. दरम्यान या घटनेनंतर रुचिका आणि तिच्या मैत्रिणींना मात्र धक्का बसतो. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओवर लिहिण्यात आलं आहे की "काल रेस्तराँसाठी शूट करत असताना आम्हाला एक धक्कादायक अनुभव आला. मला हा तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचा आहे".

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11.15 ते 11.30 दरम्यान ही घटना घडली. जवळपास 20 मिनिटं ते व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. यादरम्यान ही घटना घडली असं तिने सांगितलं आहे. 

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, "रुचिकाने सांगितलं आहे की, आम्ही कंटेंट क्रिएटर असून रेस्तराँसाठी नेहमी कंटेंट रेकॉर्ड करतो. यावेळी या तरुणांनी माझ्या हातातून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मी वेळीच सावधान झाली आणि मोबाइल मागे घेतल्याने त्यांचा प्रयत्न फसला".

बंगळुरु पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. "कृपया आम्हाला घटनेचं ठिकाण, माहिती आणि संपर्क क्रमांक द्या," असं पोलिसांनी म्हटलं आहे. 

हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर अनेकजण कमेंट करत असून काहींना आपल्याला असाच अनुभव आल्याचं शेअर केलं आहे.

"कोरमंगला येथे माझ्यासोबत असाच प्रकार घडला होता. 9057 क्रमांकाची ऑटो माझा पाठलाग करत होती. त्याने माझा मोबाइल खेचण्याचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. हा माझा नेहमीचा रस्ता आहे आणि आता मला भीती वाटत आहे," असं युजरने म्हटलं आहे. दरम्यान एकाने जर मुलांनी मोबाइल चोरला अशसा तर The Boys म्हणून रिल केली असती असं उपाहासात्मकपणे म्हटलं आहे.