तमिळनाडू : तमिळनाडूच्या पुडुकोट्टई येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जलीकट्टू या पारंपरिक खेळादरम्यान सर्वाधिक वळू मैदानात उतरवण्याचा विश्वविक्रम रविवारी रचण्यात आला. तमिळनाडूचे आरोग्य मंत्री विजयभास्कर यांच्या वतीने वीरालिमलई येथे या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये जवळपास १३४५ वळूंचा सहभाग नोंदवण्यात आला. ज्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे ४२४ स्पर्धकांनी या खेळात सहभाग घेतला होता.
यंदाच्या वर्षी जलीकट्टू या खेळादरम्यान विश्वविक्रम नोंदवला गेला असला तरीही या खेळात दोन व्यक्तींना मात्र आपला जीव गमवावा लागला आहे, तर ३० जण यात जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. राम आणि सतीश अशी मृतांची नावं असून, ते दोघंही ३५ वर्षांचे होते. खेळात सहभागी झाले असतेवेळीच त्यांच्यावर वळूंनी हल्ला केला ज्यामुळे त्यांना जबर मार लागला असून, त्यातच त्यांचा मृत्यू ओढावला. स्थानिक पोलीस प्रशासनानेही या वृत्ताला दुजोरा दिला.
#TamilNadu: Two people died during Jallikattu event in Puddukottai yesterday. (File pic) pic.twitter.com/tUnIQmnQq7
— ANI (@ANI) January 21, 2019
सुरक्षेच्या कारणामुळे आणि इतरही बऱ्याच मुद्द्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असणाऱ्या या खेळाच्या आयोजनात स्पर्धकांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात या खेळाविरोधात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती, ज्या माध्यमातून या खेळावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. आतापर्यंत या खेळांदरम्यान २०० जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षी याच वादग्रस्त खेळाने विश्वविक्रम रचला असून, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी जवळपास दुपटीने वळूंची संख्या पाहायला मिळाल्याची माहिती, वर्ल्डकिंग्स वर्ल्ड रेकॉर्ड युनियनच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली. विश्वविक्रम रचला जाण्याची बाब महत्त्वाची असली तरीही या खेळात दोघांचा बळी गेल्यामुळे पुन्हा एकदा जलीकट्टूविषयीच्या नव्या वादाला सुरुवात होण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.