Chaddi Chor Gang Caught on Camera: आतापर्यंत तुम्ही चोरीच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील, वाचल्या असतील किंवा चोरीचे सीसीटीव्ही फुटेजही इंटरनेटवर पाहिले असतील. अगदी मोबाईल चोरांपासून ते एटीएममध्ये चोरी करणाऱ्यांच्या करामती, चोरी करताना आलेल्या अपयशामुळे पोलिसांच्या तावडीत सापडणे यासारख्या गोष्टीही अनेकदा बातम्यांमध्ये पाहायला मिळतात. मात्र सध्या समोर आलेल्या एका फुटेजमध्ये विचित्र चोर कॅमेरात कैद झाले आहेत.
व्हायरल झालेला व्हिडीओ हा मध्य प्रदेशमधील आहे. येथील एका घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये 'चड्डी चोर' गँगची करामत कैद झाली आहे. जबलपूरमध्ये सक्रीय असलेल्या या गँगमधील चोर घरांबाहेर दोरीवर वाळत घातलेली महिलांची अंतर्वस्रे चोरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. या परिसरांमध्ये सातत्याने होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हींपैकी एकामध्ये या चड्डी चोर गँगची चोरी पकडली गेली आहे. या व्हिडीओमध्ये चेहऱ्याला लाल फटका बांधलेला चोर एका घरासमोर आपली स्कूटर पार्क करतो. स्कुटरवरुन खाली उतरतो रस्त्यावरुन चालत थोडा मागच्या बाजूला येतो आणि त्यानंतर दोरीवर वाळत घातलेली चड्डी चोरताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओत दिसणारा चोर हा 'चड्डी चोर' गँगचा सदस्य असल्याचं सांगितलं जात आहे. या गँगमधील सदस्य शहरभरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन घरांबाहेर दोऱ्यांवर वाळत घातलेली महिलांची अंतर्वस्रे चोरतात. हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शहरभरामध्ये स्कूटरवर फिरुन हे लोक आधी लोकवस्ती असलेल्या परिसराची रेकी करतात. त्यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून दोरीवर वाळत असलेली महिलांची अंतर्वस्रे चोरतात.
सदर घटना ही 4 एप्रिलची असल्याचं सीसीटीव्हीवरुन स्पष्ट होत आहे. जवळपास दोन आठवड्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने हलचाली करत सीसीटीव्ही फुटेजमधील संदर्भाच्या आधारे अंतर्वस्रे चोरणाऱ्या या चोराला अटक केली आहे. मात्र या गँगमध्ये अजून किती सदस्य आहेत? त्यांनी अशाप्रकारे किती चोऱ्या केल्या आहेत? असल्या चोऱ्या करण्यामागील उद्देश काय? याचा तपास पोलीस करत आहेत.
या 'चड्डी चोर गँग'च्यानिमित्ताने अनेकांना चड्डी बनियानची आठवण झाली आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये चड्डी बनियान गँगमधील चोर चड्डी बनियान घालून चोऱ्या करतात. 90 च्या दशकामध्ये या टोळ्यांचा सुळसुळाट झाला होता. अंगाला वंगण लागवल्याप्रमाणे काळं तेल फासून हे चोर चोऱ्या करायचे. आता या चड्डी बनियान गँगची दहशत कमी झाली आहे.