Tulsi Vivah 2024 : 'या' शुभ मुहूर्तावर करा तुळशी विवाह! कसा झाला तुळशीचा जन्म? पूजा विधी आणि साहित्य जाणून घ्या

Tulsi Vivah 2024 : कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. तुळशी विवाहाची पूजा केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 12, 2024, 03:51 PM IST
Tulsi Vivah 2024 : 'या' शुभ मुहूर्तावर करा तुळशी विवाह! कसा झाला तुळशीचा जन्म? पूजा विधी आणि साहित्य जाणून घ्या title=
Tulsi Vivah 2024 shubh muhurat puja timing tulsi vivah pooja vidhi samagri

Tulsi Vivah 2024 : तुळशी ही बहुगुणी आणि अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे म्हणून तिचं नातं पितरांशी, देवांशी आणि मानवाशी जोडलं गेलं आहे. तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूंच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्या समर्पण करणे. तुळशीशिवाय दररोजची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून दररोज भगवान विष्णूंना / कृष्णांना तुळशीचे एक पान वहावे, असं शास्त्रात सांगण्यात आलंय. अशी मान्यता आहे की, तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास महिलांच्या विवाह मनोकामना पूर्ण होतात. मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येतं. म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्व आहे. 

कधी आहे तुळशी विवाह?

पंचांगानुसार कार्तिक एकदशी तिथी 12 नोव्हेंबरला, मंगळवारी संध्याकाळी 6.42 मिनिटांपासून ते 13 नोव्हेंबर, बुधवारी संध्याकाळी 7.24 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जाईल.

यंदा किती दिवस आहे तुळशी विवाह सोहळा?

कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो. त्यानुसार 13 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबपर्यंत तुळशी विवाह असणार आहे. 

तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त

तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.29 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7.53 मिनिटांपर्यंत असणार आहे.

तुळशी विवाह साहित्य

4 ऊस, बोरं, चिंचा, नागवेलीची पानं, सुपाऱ्या, खारीक, बदाम, तुळशीची कुंडी, फुलं, बाळकृष्णाची मूर्ती, हळद -कुंकू, पळी, ताम्हण, फुलपात्र, आंतरपाटासाठी कपडा, हळकुंड, फराळाचे साहित्य, अष्टगंध, गहू (तांदुळ अक्षतांसाठी रंगीत), जानवे जोड, लाह्या आणि तूप इत्यादी

तुळशीसाठी सौभाग्य अलंकार 

मणी-मंगळसूत्र, जोडवे -विरोदे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी, नवीन वस्त्राचा तुकडा वस्त्र म्हणून वधू वरांना, हार, घंटा, दर्भ, सप्तपदीसाठी हवन सामुग्री समिधा

तुळशी विवाहसाठी पूजा मांडणी

तुळशीभोवती रांगोळी काढा. प्रथम तुळशीची कुंडी गेरूने रंगवून सुशोभित करावी. तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव उभारावा. तुळशीसमोर पाटावर तांदुळाचा स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवणे. बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे असावे. विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण आणि तुळशीला चढती हळद लावावी. नंतर दोघांची षोडशोपचार आणि पंचोपचार पूजा करावी. मंगलाष्टक म्हणण्या आधी पुण्याहवाचन विधी करावा. त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाट धरून, उपस्थितांना अक्षता वाटाव्यात. मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा आणि उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी द्यावी. अन्यथा घरातील पतीपत्नीनेही केले तरी चालेल. त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणी मंगळसूत्र ओटीचे आणि इतर साहित्य उपवर मुलगा वाहील. ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळेअभावी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण पर्यंत केला तरी चालतो. 

तुळशीचा जन्म कसा झाला?

समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर सांडले आणि त्यापासून तुळशी जन्माला आली. ती ब्रह्मदेवाने विष्णूंना अर्पण केली. 

तुळशी विवाह कथा 

पौराणिक कथांनुसार जालंधर नावाचा एक असुर होता. वृंदा नावाच्या मुलीशी त्याचा विवाह झाला होता. वृंदा ही विष्णूची परमभक्त होती. वृंदाच्या पतिव्रत धर्मामुळे जालंधरला कोणीही मारू शकले नाही. जालंधरला आपल्या अजेयपणाचा अभिमान वाटू लागला आणि तो स्वर्गातील मुलींचा छळ करू लागला. त्याच्या दहशतीने त्रस्त झालेले देवी-देवता भगवान विष्णूच्या आश्रयाला गेले आणि जालंधरच्या कोपापासून त्यांना वाचवण्यासाठी प्रार्थना करू लागले.

जालंधरची पत्नी वृंदा ही पतीप्रिय स्त्री होती आणि जालंधर पतिव्रत धर्माने अजेय होती, तिला कोणीही पराभूत करू शकले नाही. त्यामुळे जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रत धर्म भंग करणे आवश्यक होते. याच कारणास्तव विष्णूने आपल्या मायेने जालंधरचे रूप धारण केले आणि फसवणुकीने वृंदाचा पतिव्रत धर्म नष्ट केला. यामुळे जालंधरची सत्ता संपुष्टात आली आणि युद्धात त्याचा पराभव झाला.

वृंदाला ही फसवणूक लक्षात येताच ती संतापली आणि तिने विष्णूला शिळा होण्याचा शाप दिला. त्यानंतर वृंदा स्वतः सती बनली. सती गेल्यानंतर जिथे वृंदा भस्म झाली, तिथे तुळशीचं झाड उगवलं. देवतांच्या प्रार्थनेने वृंदाने आपला शाप मागे घेतला, परंतु विष्णूने वृंदाला केलेल्या फसवणुकीचा पश्चाताप झाला आणि त्यामुळे वृंदाचा शाप जिवंत ठेवण्यासाठी भगवान विष्णूने दगडी रूपात आपले रूप प्रकट केले. त्या रुपालाच शाळिग्राम म्हटले जाते. 

वृंदाची प्रतिष्ठा आणि पवित्रता राखण्यासाठी देवतांनी माता तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या शाळिग्राम रूपाशी केला. त्यामुळे दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला तुळशीचा विवाह शाळिग्रामाशी होतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)