महाराष्ट्र आणि केरळमध्ये रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा केंद्रीय गृह सचिवांचा सल्ला

राज्यात  पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यावेळी डेल्टा वेरियंटचा ही धोका वाढला आहे.

Updated: Aug 27, 2021, 04:12 PM IST
महाराष्ट्र आणि केरळमध्ये रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा केंद्रीय गृह सचिवांचा सल्ला title=

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसने देशात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केरळ आणि महाराष्ट्रातील कोरोनाची बिघडलेली परिस्थिती पाहता, दोन्ही राज्यांची सरकारे निर्बंध वाढवण्यासाठी आढावा घेत आहेत. त्याचवेळी, केंद्रीय गृह सचिवांनी सल्ला दिला आहे की ज्या भागात जास्त कोविड -19 प्रकरणे आहेत, तेथे रात्री कर्फ्यू लावण्यात यावा.

गृहमंत्रालयाने दोन्ही राज्यांसोबत बैठक घेतल्यानंतर गुरुवारी एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, 'संसर्गातील वाढ थांबवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. ज्या भागात जास्त प्रकरणे येत आहेत, तेथे रात्रीच्या कर्फ्यूचा विचार केला पाहिजे. या व्यतिरिक्त, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण मोहीम तीव्र करणे यासारख्या उपायांनाही वाढवावे लागेल.

अतिरिक्त लस देण्याचं आश्वासन

गृहमंत्रालयाने या राज्यांना अतिरिक्त लस देण्याचे आश्वासन दिले आहे, जेणेकरून संसर्ग नियंत्रित केला जाईल. देशात आतापर्यंत कोविड लसीचे 61 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. देशातील अर्ध्याहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा किमान 1 डोस देण्यात आला आहे. ऑगस्टच्या मध्यापासून कोरोना प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे.

केरळमध्ये सर्वाधिक प्रकरणे

केरळमध्ये गेल्या एका आठवड्यापासून नवीन प्रकरणांची वाढती संख्या समोर येत आहे. देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण केरळमधील आहेत. त्याचबरोबर, केरळ नंतर जास्तीत जास्त प्रकरणे महाराष्ट्रातून येत आहेत. केरळ आणि महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.

दरम्यान, शुक्रवारी भारतात कोविडची 44,658 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. यासह, देशातील एकूण प्रकरणांची संख्या आतापर्यंत 3.26 कोटींच्या पुढे गेली आहे. जगात अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर 496 नवीन मृत्यूंची नोंद झाल्यानंतर मृतांची संख्या वाढून 4,36,861 झाली आहे.