Unlock 5 : देशात नवे नियम लागू ; जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद राहणार

अखेर याबाबतची अधिकृत माहिती समोर आलीच... 

Updated: Sep 30, 2020, 09:44 PM IST
Unlock 5 : देशात नवे नियम लागू ; जाणून घ्या काय सुरु आणि काय बंद राहणार title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस coronavirus चा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असला तरीही आता मात्र लॉक़डाऊनचे नियम शिथिल करण्यालाच केंद्र सरकारनं प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा चालना देण्यासाठीसुद्धा यामध्ये प्राधान्य देण्यात येत आहे. किंबहुना त्याच अनुषंगानं काही नियमही लागू करण्यात आले आहेत. अनलॉकच्या याच सत्रात पुढच्या म्हणजेच पाचव्या टप्प्याची सुरुवात १ ऑक्टोबरपासून होत आहे. ज्यासाठी केंद्रातर्फे गृहमंत्रालयानं काही मार्गदर्शक तत्त्वं लागू केली आहेत. जाणून घ्या काय आहेत ही मार्गदर्शक तत्त्वं... 

- थिएटर, मल्टीप्लेक्स हे ५० टक्के क्षमतेनं सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय स्वतंत्र एसओपी जाहीर करणार आहे. 

- बिजनेस टू बिजनेस (बी 2 बी) एग्जिबिशंस लावण्यात येणार आहे. ज्यासाठी वाणिज्य विभाग एसओपी जारी करणार आहे. 

- खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी वापरात असणारे जलतरण तलाव सुरु करण्यात अनुमती. ज्यासाठी क्रीडा मंत्रालयाची एसओपी जारी करण्यात येणार आहे. 

- अम्यूजमेंट पार्क आणि अशाच पद्धतीच्या ठिकाणी खेळण्यासाठी जाण्याची परवानगी असेल. ज्यासाठी आरोग्य आणि कुटुंब विकास मंत्रालय एसओपी आणणार आहे. 

- शाळा, महाविद्यालयं, शिक्षण संस्छा आणि कोचिंग क्लासेस अर्थात शिकवणी वर्ग टप्प्याटप्प्यानं सुरु करण्यासाठी राज्य/ केंद्र शासित प्रदेशांना निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन १५ ऑक्टोबरनंतर याबाबतचा निर्णय ते घेऊ शकणार आहेत. 

- यादरम्यान ऑनलाईन शिक्षणपद्धती सुरुच राहणार आहे. यापुढील काही काळासाठी शक्य तितकं या माध्यमाला प्राधान्य देण्यात येणार आहे. 

- उच्च शिक्षणासाठीच्या संस्था सुरु करण्याचा निर्णय गृहमंत्रालय घेणार आहे. 

- १५ ऑक्टोबरपासून पीएचडी विद्यार्थी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुरु असणाऱ्या प्रयोगळाशा आणि प्रायोगिक तत्त्वावर वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रातील परिस्थिती.... 

राज्यात रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक-5 चे नियम आज जाहीर केले आहेत. 

 

रेस्टॉरंट आणि बार सुरू करताना कोणती काळजी घ्यायची, इतर काय अटी असतील हे पर्यटन विभाग लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगण्यता आलं आहे.