BJP Leader Suicide Attempt: उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पंजाब अकादमीचे सदस्य आणि माजी राज्यमंत्री भाजपाचे नेते विक्की छाबडा (Vicky chhabra) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विक्की छाबडांबरोबर त्यांच्या पत्नीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. रिजेन्सी रुग्णालयामध्ये या दोघांना दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना विक्की छाबडांना भेटण्यासाठी रुग्णालयामध्ये पोहोचले आहेत.
विक्की छाबडा आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना फजलगंज पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली. कौटुंबिक वादामधून विक्की छाबडा आणि त्यांच्या पत्नीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्की यांची पत्नी परमिंदर कौर यांनी जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचं सेवन केलं. तसेच विक्की यांनीही अधिक प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या.
दोघांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रिजेन्सी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. छाबडा आणि त्यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या घराबाहेर तसेच रुग्णालयाबाहेर समर्थक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
दोघांनाही दोन मुलं असून आई-वडिलांना अत्यावस्थ वाटू लागल्यानंतर मुलांनी शेजऱ्यांना याबद्दल कळवलं असता त्यांनीच विक्की आणि परमिंदर यांना रेजन्सी रुग्णालयात दाखल केलं. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विक्की यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने त्यांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे.