धक्कादायक! जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी कापला खासगी भाग; कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप

UP Crime News : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरवर हिंदू मुलाची शस्त्रक्रिया करून धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार देखील केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.  

आकाश नेटके | Updated: Jun 26, 2023, 10:12 AM IST
धक्कादायक! जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी कापला खासगी भाग; कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप title=

UP Crime : आपल्याकडे डॉक्टरांना देवासारखचं मानलं जातं. अनेकदा डॉक्टर मरणाला टेकलेल्या रुग्णाला जीवनदान देतात. पण काही डॉक्टरांच्या चुकीच्या कृतीमुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडून जातो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (UP News) घडलाय. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) उत्तर प्रदेशातील एका मुलाची चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांना (UP Police) नोटीस बजावली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथील एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरवर हिंदू मुलाच्या खासगी भागाची शस्त्रक्रिया (circumcision) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बळजबरीने खासगी भागाची शस्त्रक्रिया करून धर्मांतर केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल थेट उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची एक जीवघेणी घटना समोर आली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी एका मुलाची चुकीची शस्त्रक्रिया केली आहे. डॉक्टरांनी निष्काळजीपणे अडीच वर्षाच्या चिमुरड्याच्या जीभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी मुलाच्या खासगी भागाची शस्त्रक्रिया केली आहे. हा प्रकार घरच्यांना कळताच एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनेचे नेते रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी जाणूनबुजून मुलाची चुकीची शस्त्रक्रिया करून त्याला मुस्लिम बनवले असा आरोप आता केला जात आहे.

बरेली जिल्ह्यातील बारादरीतील संजय नगर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या अडीच वर्षांच्या मुलाला बोलता येत नव्हते. त्या व्यक्तीला कोणीतरी सांगितले की मुलाच्या जिभेची शस्त्रक्रिया केली तर सगळं काही ठीक होईल. त्यामुळे मुलाच्या वडिलांना त्याला देलापीर येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टर मोहम्मद जावेद याने मुलाच्या जीभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी मुलाची चुकीची शस्त्रक्रिया केली असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. वाऱ्यासारखी ही बातमी सगळीकडे पसरली. घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनांचे नेते रुग्णालयात दाखल झाले होते.

दुसरीकडे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने चुकीच्या पद्धतीने मुलाची खतना केल्याची दखल घेतली आहे. खतना करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याचा विचार आयोग करत आहे. आयोगाने याबाबत बरेली पोलिसांकडे तक्रारही केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक रुग्णालयात पाठवले आहे आणि आरोपात सत्यता आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

दरम्यान, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ बलबीर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीय मुलाच्या जिभेच्या उपचारासाठी एम खान रुग्णालयात गेले होते.त्यावेळी डॉक्टरांनीही त्यांना जिभेवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी जिभेवर शस्त्रक्रिया करण्याऐवजी मुलाच्या खासगी भागाची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.