लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) हे मुख्यमंत्री होणार हे ठरलेलं असलं तरी उपमुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम आहे. यूपी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी काही नावे चर्चेत आहे. त्याआधी योगी आदित्यनाथ यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांनी भेट घेतली.
जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाजपच्या नव्या मंत्रिमंडळात सर्व जातीच्या लोकांना स्थान देण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. यंदा जाट समाजातील नेत्याला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जावू शकते. सध्या या पदासाठी केंद्रीय मंत्री संजीव बालियान (Sanjeev Balyan) यांचं नाव चर्चेत आहे.
योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात 2 उपमुख्यमंत्री होते. केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. पण आता योगी सरकारमध्ये तीन उपमुख्यमंत्री असू शकतात. दिल्लीत याचा निर्णय होणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री आणि मुजफ्फरनगरमधून खासदार संजीव बालियान यांचं नाव चर्चेत आहे. पश्चिम यूपी भागात जाट समुदायाचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे भाजप जाट समाजातील नेत्याला एक उपमुख्यमंत्रीपद देण्याचा विचार करत आहे. सुरेश राणा आणि संगीत सोम या 2 जाट समाजातील लोकांना पराभवाचा सामना करावा लागला. मुजफ्फरनगरमध्ये भाजपला 6 पैकी फक्त 2 जागा मिळाल्या आहेत.