हे मंदीर हवामानाचा अंदाज व्यक्त करतं, पाहा या वर्षीच्या पावसाचा अंदाज काय व्यक्त केलाय?

 या भागातील शेतकरी शेतीसाठी हवामान विभागावर अवलंबून न रहाता या मंदिराच्या भविष्यवाणी वरुन हवामानाचा अंदाज घेतात.

Updated: Jun 6, 2021, 08:21 PM IST
हे मंदीर हवामानाचा अंदाज व्यक्त करतं, पाहा या वर्षीच्या पावसाचा अंदाज काय व्यक्त केलाय? title=

कानपूर : आपल्या राज्यातील किंवा देशातील हवामानाचा अंदाज भारताच्या हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात येत असतो. वादळ कधी आणि कोणत्या दिशेने येणार? पाऊस कधी पडणार? कोणत्या भागात जोरदार पाऊस होणार? हे सगळ आपल्याला या विभागाकडूनच सांगण्यात येते. शेतकरी ही शेतीसाठी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी या विभागावर अवलंबून असतो.

परंतु उत्तर प्रदेशमध्ये असे एक मंदिर आहे, जे देशातील पावसाळा कसा असेल आणि तो कधी येणार हे सांगते. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतीसाठी हवामान विभागावर अवलंबून न रहाता या मंदिराच्या भविष्यवाणी वरुन हवामानाचा अंदाज घेतात. काय खास आहे या मंदिरामध्ये जाणून घेऊया.

यूपीच्या कानपूर जिल्ह्यातील भितरगावच्या जगन्नाथ मंदिराने यावेळीचा मान्सून कमी प्रमाणात असल्याचे संकेत दिले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, पावसाळ्याच्या आगमनाच्या काही दिवस आधी, मंदिराच्या घुमटात असलेल्या दगडातून पाण्याचे थेंब पडतात. मंदिराचे पुजारी जमिनीवर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाच्या आकारावरुन पावसाची भविष्यवाणी करतात.

माध्यमांच्या वृत्तानुसार, मंदिराचे विद्यमान पुजारी पं. के.पी. शुक्ला म्हणाले की, दोन दिवसांपासून घुमटातून लहान थेंब थेंब पडत आहेत. त्यानुसार यंदा पाऊस कमी होईल.

बेहटा बुजुर्ग गावातील हे मंदिर पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. मंदिराचे पुजारी के.पी. शुक्ला सांगतात की, त्यांच्या सात पिढ्या मंदिराची सेवा करत आहेत. त्यामुळे त्यांचा असा दावा आहे की, हे मंदिर पावसाचा अंदाज अचूक देते. त्यांचे असे म्हणने आहे की, जेव्हा मंदिराच्या घुमटातून पाण्याचे थेंब पडू लागतात, तेव्हा आजूबाजूच्या खेड्यातील लोकं आपल्या शेतातील कामे उरकण्यास सुरवात करतात.

पाण्याचे थेंब कसे पडतात? हे शोधण्यासाठी येथे बरेच सर्वेक्षण केले गेले आहेत. परंतु अद्याप या मागचे कारण समोर आलेले नाही. पुरातत्व शास्त्रज्ञांना मंदिराच्या निर्मितीचा देखील नेमका कालावधी निश्चित करता आला नाही. परंतु असे म्हटले जाते की, मंदिराचे अंतिम नूतनीकरण 11 व्या शतकात केले गेले आहे.