सुनेनं नाकारली टीशर्ट-जीन्स घालण्याची सासूची इच्छा; नवऱ्यानं केली बेदम मारहाण

UP News : उत्तर प्रदेशात एक वेगळचं प्रकरण समोर आलं आहे. सासूने जीन्स, टीशर्ट घालायला जबरदस्ती केल्याने सूनेने थेट पोलीस ठाणे गाठलं आहे. शेवटी हे प्रकरण समुपदेशन केंद्रात गेले आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 20, 2023, 04:32 PM IST
सुनेनं नाकारली टीशर्ट-जीन्स घालण्याची सासूची इच्छा; नवऱ्यानं केली बेदम मारहाण title=

Shocking News : सासू सुनेचं भांडण हे कोणत्या कुटुंबासाठी नवं नाही. पण उत्तर प्रदेशातून एक विचित्र घटना समोर आली आहे. साधेपणाचं जीवन जगणाऱ्या सुनेला सासूला मॉर्डन बनवणं चांगलेच महागात पडलं आहे. साधी राहणी आवडणाऱ्या सुनेचा सासरच्यांशी जबरदस्त वाद झालाय. ग्रामीण भागातून लग्न करून शहरात आलेल्या सुनेला सासरच्या मंडळींकडून जीन्स आणि टी-शर्ट घालायला सांगितले जात होते. पण सूनबाईला साडी नेसणेच पसंत होते. यावरुनच सासरचे लोक तिला सातत्याने टोमणे मारायचे. प्रकरण इतकं वाढलं की याच कारणावरुन पतीने पत्नीला थेट मारहाणरच केली. त्यानंतर संतापलेल्या सुनेने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या एतमादपूर परिसरातील एका गावातील तरुणीचे काही महिन्यांपूर्वी शहरातील एका कुटुंबात लग्न झाले होते. तरुणीचा पती एका खासगी कंपनीत काम करतो. सासरे देखील आधुनिक विचारांचे आहेत. स्वतः पाश्चिमात्य संस्कृतीचे कपडे घालत असल्यामुळे सासरच्या मंडळींना सुनेने सुद्धा असंच राहिलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. वेस्टर्न कपडे घालण्यास सासरच्यांनी तरुणीला सांगितलं होतं. माझी सासू मला जीन्स आणि टी-शर्ट घालायला सांगते. पण माझा जीन्स आणि टी-शर्टवर आक्षेप आहे. मला साडी नेसायला आवडते. यावरुन सासरचे लोक मला टोमणे मारतात, असे मुलीने सांगितले. हद्द तेव्हा झाली जेव्हा यावरुन पतीने मला मारहाण केली. त्यामुळेच आपण पोलिसांत तक्रार केली असेही तरुणीने सांगितले. शेवटी पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले.

तक्रारदार पत्नीला साडी नेसायला आवडत असल्याचे तिने सांगितले. सासरच्या घरी ती साडी नेसते होती. जेव्हा तिच्या सासूने जीन्स आणि टी-शर्टसाठी आग्रह करण्यास सुरुवात केली तेव्हा तिने स्पष्टपणे नकार दिला. पतीने तिच्यासाठी बाजारातून जीन्स आणि टी-शर्ट देखील आणले. मात्र तिने जीन्स घालण्यास नकार दिला. यावर तिच्या पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. याबाबत मुलीने तिच्या आई वडिलांना याची माहिती दिल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले. समुपदेशकाने दोन्ही बाजूच्या लोकांना कार्यालयात बोलावले होते. अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंच्या लोकांच्या समुपदेशन केले. मात्र तरीही दोन्ही बाजूंमधील वाद मिटू शकला नाही. दोन्ही पक्षांना आता पुढील तारीख देण्यात आली आहे.