अयोध्या : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या म्हणजेच 7 जुलैला राम नगरी अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 7 फुटाच्या प्रभु रामाच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. अयोध्येत राम मूर्ती लावणार असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यामुळे राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे अयोध्येत योगी आदित्यनाथ यांचे जंगी स्वागत होणार आहे. अयोध्या शोध संस्थानातर्फे या मूर्तीची स्थापना होईल.
काष्ठ कला दुर्मिळ मूर्तीची स्थापना अयोध्येच्या शोध संस्थान शिल्प संग्रहालयात करण्यात येणार आहे. ही मूर्ती पुढच्या काळात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरणार आहे. ही मूर्ती कावेरी कर्नाटक स्टेट आर्ट एंड क्राफ्ट एंपोरियम येथून खरेदी करण्यात आली आहे. यासाठी 35 लाख इतकी किंमत मोजण्यात आली आहे. या मूर्तीला 2017 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 7 जूनला न्यास अध्यक्ष गोपाल दास यांच्या जन्मोत्सवात योगी आदित्यनाथ सहभागी होणार असून या मूर्तीचे अनावरण करणार आहेत.
रामकथा संग्रहालयात कर्नाटक शैलीतील कोदम्ब रामाच्या मूर्तीचे दर्शन सर्वसामान्यांना लवकरच करता येणार आहे. उद्या मूर्ती स्थापनेवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मूर्ती बनवणारे एमएम मूर्ती उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री योगी त्यांचा सत्कार करणार आहेत.