'मला तुमच्या डोळ्यात बघत राहावसं वाटतं'; आझम खान यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेत गोंधळ

तुम्हाला सभागृहात अशाप्रकारे बोलण्याची परवानगी नाही.

Updated: Jul 25, 2019, 04:25 PM IST
'मला तुमच्या डोळ्यात बघत राहावसं वाटतं'; आझम खान यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेत गोंधळ

नवी दिल्ली: वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी गुरुवारी लोकसभेत आपल्या वाचाळपणामुळे वाद ओढावून घेतला. लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी लोकसभेच्या उपाध्यक्ष रमा देवी सभागृहाचा कारभार सांभाळत होत्या. तेव्हा आझम खान यांनी रमा देवी यांना उद्देशून म्हटले की, तुम्ही मला इतक्या चांगल्या वाटता की, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघतच राहावेसे वाटते. मला मुभा मिळाली तर मी कधी तुमच्यावरून नजर हटवणारच नाही, असे आझम खान यांनी म्हटले. 

आझम खान यांच्या या विधानावर केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी तात्काळ आक्षेप घेतला. आझम खान यांनी या वक्तव्यासाठी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर लोकसभेच्या उपाध्यक्ष रमा देवी यांनीही आझम खान यांना फैलावर घेतले. अशाप्रकारे बोलणे योग्य नाही. कृपया तुम्ही स्वत:चे शब्द मागे घ्या, असे रमा देवी यांनी म्हटले. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही आझम खान यांना माफी मागण्याचे आदेश दिले. तुम्हाला सभागृहात अशाप्रकारे बोलण्याची परवानगी नाही. संपूर्ण देश सभागृहाचे कामकाज पाहत असतो, असे ओम बिर्ला यांनी म्हटले. 

यावर आझम खान यांनी लगेचच सारवासारव करत म्हटले की, माझ्या मनात तुमच्याविषयी आदर आहे. तुम्ही मला बहिणीप्रमाणे आहात, असे आझम खान यांनी सांगितले.