मानवी ढाल म्हणून वापरलेला 'तो' काश्मिरी तरूण निवडणुकीत बजावतोय कर्तव्य

जवळपास २८ गावांमधून फारुखला जीपवर बांधून फिरवण्यात आले होते.

Updated: Apr 18, 2019, 09:15 PM IST
मानवी ढाल म्हणून वापरलेला 'तो' काश्मिरी तरूण निवडणुकीत बजावतोय कर्तव्य title=

नवी दिल्ली: दोन वर्षांपूर्वी काश्मीरमधील संतप्त जमावाला आवरण्यासाठी मेजर लितुल गोगोई यांनी मानवी ढालीसारखा वापर केल्यामुळे फारुख अहमद दार हा तरुण प्रचंड चर्चेत आला होता. मात्र, आज हाच तरुण काश्मीरमध्ये निवडणूक कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावत असल्याचे समोर आले आहे. फारुख अहमद दार हा काश्मीर सरकारच्या आरोग्य खात्यात कामाला असून त्याची निवडणूक कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

९ एप्रिल २०१७ रोजी श्रीनगर पोटनिवडणुकीच्यावेळी हा प्रकार घडला होता. त्यावेळी बडगामच्या उटलीगाम मतदान केंद्राच्या परिसरात संतप्त जमावाकडून जोरदार दगडफेक सुरु होती. ही परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन मेजर लितुल गोगोई यांनी निवडणूक कर्मचारी आणि जवानांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी फारुख अहमद दार या तरुणाला जीपच्या बोनेटवर बांधले होते. फारुखचा मानवी ढालीसारखा वापर करून भारतीय जवान येथून बाहेर पडले होते. मात्र, हा प्रकार समोर आल्यानंतर भारतीय लष्कराला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. जवळपास २८ गावांमधून फारुखला जीपवर बांधून फिरवण्यात आले होते. निवडणूक अधिकारी आणि सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस यांना सुमारे बाराशे जणांच्या जमावाने घेरले होते. मी तरुणाला जीपला बांधले नसते तर जमावाच्या हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले असते असे मेजर गोगोई यांनी म्हटले होते. त्यावेळी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी गोगोई यांच्या कृत्याचे समर्थन करुन त्यांना प्रशस्तिपत्र दिले होते.