शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू...

उत्तर प्रदेशातील देवरिया येथील नेहरू नगर परिसरातील मार्डन सिटी माॅन्टेसरी शाळेमधील एका विद्यार्थिनीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 19, 2017, 09:51 AM IST
शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू...  title=

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील देवरिया येथील नेहरू नगर परिसरातील मार्डन सिटी माॅन्टेसरी शाळेमधील एका विद्यार्थिनीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक फरार आहेत. याप्रसंगी आपल्या मुलीला शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी तिसऱ्या मजल्यावरून धक्का दिल्याचा आरोप मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी केला आहे. 

सिटी माॅन्टेसरी शाळेचे कार्यवाहक मुख्याध्यापक मिथिलेश मिश्रा यांनी सांगितले की, मुलगी खाली पडल्यानंतर ताबडतोब तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर तिच्या पालकांना देखील कळवण्यात आले होते. परंतु, या सगळ्या प्रकरणात त्यांनी शाळेचा सीसीटीव्ही कॅमेरा काही दिवसांपासून बंद असल्याचे देखील कबूल केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी सिटी माॅन्टेसरी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती. शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिला कोणीतरी धक्का दिल्याचा आरोप करण्यात आला असला तरी हे कृत्य कोणी केले, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. गंभीररित्या जखमी झालेल्या विद्यार्थीनीला स्थानिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तिला गोरखपूर हलविण्यास सांगितले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर शाळेचे अधिकारी फरार आहेत. मृत विद्यार्थिनीचे नाव नीतू चौहान असून ती चाकीयवा येथे राहणारी आहे. 
या घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक तिवारी हे फरार असून त्यांचा मोबाईल देखील बंद आहे.

गुरुग्राम येथे प्रद्युमन याच्या हत्येनंतर शाळेच्या सुरक्षिततेबाबतीत  लोकांच्या मनात शंका निर्माण झाली असताना असुरक्षितता वाढवणारी ही घटना समोर आली आहे. पोलीस आणि शासन यासंदर्भात कसून चौकशी करणार आहेत.