मुंबई : देशात ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता यूपीच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. झपाट्याने वाढणारा ओमिक्रॉन संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याअंतर्गत 25 डिसेंबर रोजी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत राज्यभर संचारबंदी लागू राहणार आहे. त्याचवेळी, विवाहसोहळ्यात केवळ 200 लोकांना परवानगी असेल. ओमिक्रॉनचा वाढता धोका रोखण्यासाठी सीएम योगींनी उच्चस्तरीय टीम-9 ला सूचना दिल्या आहेत.
उच्चस्तरीय टीम-9 ला दिलेल्या सूचनांनुसार, “नो मास्क, नो माल” असा संदेश देऊन व्यापाऱ्यांना बाजारपेठांमध्ये जागरूक करा. कोणत्याही दुकानदाराने ग्राहकाला मास्कशिवाय वस्तू देऊ नये. रस्त्यावर/बाजारात प्रत्येकासाठी मास्क अनिवार्य केले पाहिजेत. पोलीस दलाने सतत गस्त घातली पाहिजे. पब्लिक अॅड्रेस सिस्टीम अधिक प्रभावी बनवायला हवी.
देशाच्या कोणत्याही राज्यातून किंवा परदेशातून उत्तर प्रदेशच्या सीमेवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ट्रेसिंग-चाचणी केली जाईल. बस, रेल्वे आणि विमानतळांवर अतिरिक्त दक्षता घ्यावी.
तिसर्या लाटेच्या दृष्टीने गावे आणि शहरी वाड्यांमध्ये देखरेख समित्या पुन्हा सक्रिय करा. बाहेरून येणार्या प्रत्येकाची चाचणी झाली पाहिजे. तसेच, त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवले पाहिजे. आवश्यकतेनुसार लोकांना क्वारंटाईन ठेवणे आणि रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.
सीएम योगी म्हणाले की, 'कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आम्ही यापूर्वी तयारी केली आहे. ज्याची पुनर्तपासणी व्हायला हवी. राज्यातील सर्व सरकारी/खासगी वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांची बारकाईने तपासणी केली पाहिजे. औद्योगिक युनिट्समध्ये कोविड हेल्प डेस्क आणि डे केअर सेंटर पुन्हा सक्रिय करा.'