Uttarakhand : उत्तराखंडमधील डेहराडून (Dehradun) जिल्ह्यातील पाचवडून येथे एक हृदयद्रावक दुर्घटना समोर आली आहे. एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट ( gas cylinder exploded) झाल्याने चार मजली घराला भीषण आग लागली. घराला लागलेल्या आगीत चार निष्पाप मुलींचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाने (fire brigade) आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. तासाभराच्या अथक परिश्रमानंतरही आगीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाकडे पुरेसे पाणी नसल्यामुळे आग आटोक्यात बराच वेळ लागल्याचा आरोप नागरिकांनी केला.
गुरुवारी संध्याकाळी तुनीबाजार येथील पुलाजवळील चार मजली घरात सिलिंडरला अचानक आग लागल्याने मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण घरात आग पसरली. अख्खा चौथा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. या मजल्यावर तीन कुटुंबे राहत होती. आग लागली त्यावेळी मुलांचे पालक कसेतरी बाहेर पडण्यात यशस्वी झाले अन् आगीत अडकलेल्या आपल्या मुलांचा शोध घेत राहिले. मात्र चार चिमुकल्यांचा या आगीत जिवंत जळून मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या एका घरात कुटुंबातील सदस्य एलपीजी सिलिंडरमधील गॅस संपल्यामुळे तो बदलत होते. मात्र नव्या सिलिंडरमधून अचानक गॅसची गळती होऊ लागल्याने त्याला आग लागली. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घराला आग लागली. काही वेळातच घर पेटले आणि घरभर धूर पसरला. त्यामुळे कुठेही काहीच दिसत नव्हते. शेजारच्यांना ही गोष्ट कळताच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी सगळेजण धावू लागले. दुसरीकडे तिन्ही कुटुंबातील मोठी मंडळी वाचली. तर एका महिलेने कसेतरी आपल्या मुलाला बाहेर काढले. मात्र, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात महिला गंभीरपणे भाजली. दुसरीकडे चार मुली जिवंत जळाल्या.
दुसरीकडे स्थानिकांनी अग्निशमन विभागावर गंभीर आरोप केले आहेत. अर्धा किलोमीटरवर असलेल्या अग्निशमन दलाला घटनेच्या ठिकाणी अर्धा तास लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच गाडीत पाणी नसल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही. या धक्कादायक घटनेत आग विझवण्यापासून ते उपचार मिळण्यापर्यंत अनेक ठिकाणी निष्काळजीपणा दिसून आला. अग्निशमन दलाच्या जवानांना पाईपचे नोझलही वाहनावर बसवता आले नाही. घटनास्थळी उपस्थित लोकांनी कसे तरी नोझल लावले, पण काही वेळातच अग्निशमन दलाचे पाणी संपले.
त्यानंतर स्थानिकांनी उत्तरकाशीमधील मोरी आणि हिमाचल प्रदेशातील रोहरू येथे तैनात अग्निशमन दलाच्या वाहनात पाणी संपल्याने माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. दोन्ही गाड्या येईपर्यंत आगीने विक्राळ रुप धारण केले होते. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी तासाभराचा अवधी लागला. दुसरीकडे स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या पाणी भरण्यासाठी सहा किलोमीटर दूर गेल्या होत्या. मात्र घटनास्थळावरुन 30 मीटर खाली टोन्स नदी वाहत होती तरी अग्निशमन दल सहा किलोमीटर लांब गेले आणि दीड तासाने परतले.