'हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका' एक कॉल आणि महिलेला 3.55 कोटींना लुटले

Varanasi Crime: आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात तुमचा फोन बंद होईल. आता तुम्हाला पोलिसांकडून फोन येईल, असे त्याने सांगितले.

Pravin Dabholkar | Updated: Apr 13, 2024, 03:03 PM IST
'हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका' एक कॉल आणि महिलेला 3.55 कोटींना लुटले  title=
Varanasi Crime

Varanasi Crime: तंत्रज्ञान प्रगत होतंय तसे चोरदेखील चोरीच्या वेगवेगळ्या योजना आखताना दिसतात. कोणी लॉटरी लागली सांगून, कोणी ओटीपी मागून तर कोणी आधार अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक करताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. वाराणसीच्या सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला. शम्पा रक्षित या निवृत्त शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. या एका फोनमुळे त्यांच्या अकाऊंटमधून 3.55 कोटी रुपये उडाले. नेमका कसा घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

शम्पा रक्षित यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला. आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात तुमचा फोन बंद होईल. आता तुम्हाला पोलिसांकडून फोन येईल, असे त्याने सांगितले. यानंतर खरोखरच त्यांच्या मोबाईलवर आणखी एक फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण विलेपार्ले पोलीस स्थानकातून विनय चौबे बोलत असल्याचे सांगितले. 

तुम्ही घाटकोपरमधून हा नंबर घेतला, जो पूर्णपण अवैध आहे. तुमच्या विरोधात अटक वॉरंट निघाले आहे. तुम्ही घरीच राहा आणि कोणाला काही सांगू नका, असे समोरची व्यक्ती फोनवर सांगू लागली. तसेच आरबीआयला पैसे पाठवावे लागतील. तपास झाल्यानंतर पैसे परत पाठवले जातील, असे त्याने सांगितले. 

आतापर्यंत 18 आरोपी ताब्यात

धमकीला घाबरुन महिलेने आधी 3 कोटी आणि नंतर 55 लाख रुपये पाठवले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. 8 मार्चला ही घटना घडली होती. याप्रकरणी 18 जणांना तुरुंगात पाठवण्यात आले. यातील तिघेजण राजस्थानच्या केकडी जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती क्राइम ब्रांचच्या डीसीपी चंद्रकांत मीना यांनी दिली. 

1200 युजर्सच्या खात्यात रक्कम ट्रान्स्फर 

आरोपींकडे 18 मोबाईल, 20 सिमकार्ड, 32 एटीएम कार्ड, अनेक चेकबुक, 1 लाख 20 हजाराची कॅश आणि20 लाख किंमतीची एक कार सापडली. आपली ओळख लपवून ते सायबर क्राइम करायचे, अशी कबुली आरोपींनी दिली. 

ज्याला फसवायचे असेल त्याचे बॅंक खाते, सिम कार्डसंबंधी माहिती आरोपी गोळा करायचे. यानंतर फसवून जमा केलेली रक्कम बेटिंग, लॉटरी गेमिंग अॅप्लिकेशन संबंधित युजर्सकडे पाठवायचे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी 1200 यूजर्सच्या खात्यात पैसे पाठवले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.